Pimpri News: सत्ताधाऱ्यांनी वाहत्या गंगेत हात धुतला; उपसूचना देत आणखी दोन भूखंड खासगी संस्थेच्या घशात
Pimpri News: कोट्यवधीचे भूखंड आंदण

Pimpri News: सर्वपक्षीय नगरसेवकांचा विरोध डावलून पुनावळेतील शैक्षणिक आरक्षणाचा ९१ गुंठ्यांचा भुखंड खासगी संस्थेला देण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.
या प्रस्तावावर चर्चा सुरू असतानाच आकुर्डी व कासारवाडी येथील दोन जागा ३० वर्षासाठी खासगी संस्थांना देण्याबाबत उपसूचनद्वारे निर्णय घेण्यात आला. यावरून आरोपांना न जुमानता कोट्यवधींचे भूखंड खासगी संस्थांच्या घशात घालत सत्ताधारी भाजपाने वाहत्या गंगेत हात धुवून घेतले आहे.
महापालिकेने मंजूर विकास आराखड्यात पुनावळे येथील सर्वे क्र. ३८ पै. व ४४ पै. मधील सुमारे ०.९१ हेक्टर (अंदाजे २ एकर, ११ गुंठे) जागा विकास आराखड्यात माध्यमिक शाळेसाठी आरक्षित आहे. परंतु, हा भूखंड एका खासगी शिक्षण संस्थेला ३० वर्षांसाठी भाडेकराराने देण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रस्तावाला सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांकडून विरोध झाला.
मात्र, विरोधाला न जुमानता सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे आणि महापौर रवि लांडगे यांनी हा प्रस्ताव मंजूर केला. मात्र, ही मंजुरी देत असताना उपसूचना देत आणखी दोन भुखंडाबाबत मोठे निर्णय घेतले. आकुर्डी येथील महापालिकेच्या मालकीच्या जागेवर डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीमार्फत शैक्षणिक संस्था चालविण्यात येत आहे.
या जागेचा भाडेपट्टा सन २००२ मध्ये करण्यात आला असून संस्थेच्या नावात शासनाच्या आदेशानुसार बदल होऊन डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटी असे नामांतर करण्यात आलेले आहे.
तसेच, संस्थेमार्फत भाडेपट्टा पुढील ३० वर्षांच्या कालावधीसाठी नूतनीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संस्थेत विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू असून शैक्षणिक कार्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये. संस्थेच्या मागणीचा सकारात्मक विचार करून या भाडेपट्ट्याची मुदत पुढील ३० वर्षांसाठी वाढविण्यास देखील मान्यता देण्यात आली.
कासारवाडी येथील स. नं. ४३२, ४४४/२ ते ६, ४४२/३ व ४, ४५१/२, तसेच सि.स. नं. २५६६ मधील सार्वजनिक सुविधा क्षेत्र अंदाजे ८ हजार ८३१ चौरस मीटर भुखंडाबाबत सभेत उपसूचना देण्यात आली. या जागेवर अक्षरविश्व या ज्ञानसंकुलांतर्गत ग्रंथालय, डिजिटल अभ्यासिका, स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्र, मराठी साहित्य परिषद कार्यालय, मनोमय कक्ष व इतर ज्ञानाधारित सुविधा उभारण्यास यापूर्वी मान्यता दिली आहे. Pimpri News
या सुविधांसाठी आनंदग्राम सामाजिक सेवाभावी संस्था, भोसरी यांना महापालिकेच्या नियम व अटींच्या अधीन राहून नाममात्र भाडे आकारून ३० वर्षांच्या कालावधीसाठी जागा भाडेतत्त्वावर देण्यास मान्यता देण्यात आली. पुनावळे येथील जागा खासगी संस्थेला देण्यास विरोध होत असतानाच महापौर रवि लांडगे यांनी या दोन संस्थांना महापालिकेच्या जागा आंदण दिल्या.
महापौरांची दुटप्पी भूमिका
मागील पंचवार्षिकमध्ये नगरसेवक असलेल्या रवि लांडगे यांनी भोसरी येथील महापालिकेच्या रुग्णालयाचे खासगीकऱण करण्यास कडाडून विरोध केला होता. मात्र, आता पदावर असताना पुनावळे शाळेची जागा खासगी संस्थेला देण्यास नागरिकांचा विरोध होता.
सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांचाही विरोध होता. तसे असताना महापौरांनी हा प्रस्ताव मंजूर केला. दुसरीकडे आणखी दोन भुखंडांचे प्रस्ताव उपसूचनेद्वारे मंजूर करत खासगीकरणाला बळ दिले आहे. Pimpri News
महापालिककेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान
महापालिकेने यापूर्वी १८ खासगी शिक्षण संस्थाना १५ इमारती व ३ रिकामे भूखंड अत्यल्प दराने भाड्याने दिलेले आहेत. काही अकरा महिने ते ३० वर्ष कालावधीपर्यंत कराराने दिले आहेत. यामधील काही खासगी शिक्षण संस्थानी लाखो रुपयाचे भाडे थकविले आहे.
काही संस्थानी महापालिकेच्या जागेवर कायमस्वरुपी ताबा मिळवण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे महापालिकेला कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे.
हेही वाचा:





