कुऱ्हाडीचा दांडाच आपला, मग झालेल्या घावांची वेदना सांगणार कोणाला; उद्धव ठाकरे भावूक

मुंबई – शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे बंडखोरी केल्यानंतर आपल्यासोबत 46 आमदार असल्याचा दावा केला आहे. शिवाय आमदारांसोबतचा फोटोही शेअर केला होता. मात्र आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचा नेमका आकडा समोर आला आहे. त्यावर आज उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करून जनतेशी संवाद साधला. यावेळी ते भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
उद्धव ठाकरे म्हणाले की, मला कोणताही मोह नाही. मी ओढून ताणून खुर्चीला चिकटून बसणारा नाही. मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र आहे. कोणताही मोह मला थांबवू शकत नाही, पण हे माझ्या समोर येऊन बोला. उगाच काहीतरी शिवसेनेशी आम्ही गद्दारी करणार नाही. पण ही शिवसेना आमची नाही, असं म्हणू नका. या सगळ्यात नुकसान कोणाचं होतं? असा सवालही त्यांनी केला.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी एका बोधकथेचं उदाहरण दिले. ते म्हणाले की, आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत की, एका जंगलामध्ये एक लाकूडतोड्या झाड तोडत होता. कुऱ्हाडीच्या सहाय्याने तो झाडावर घाव घालत होता. सगळे पक्षी त्याच्यावरती राहणारे हे कासावीस झाले. आता झाड कोलमडून पडणार, पण लाकुडतोड्या घाव घालत असताना या झाडाला वेदना किती होत असतील? म्हणून ते पक्षी त्या झाडाशी बोलायला लागले.
पक्षांनी विचारलं झाडाला की दादा तुला खूप वेदना होत असतील ना रे, तुझ्यावरती हे कुऱ्हाडीचे घाव पडताहेत. त्यावर झाडाने उत्तर दिलं की मला वेदना होतंय, दुःख होतंय. पण ते घाव पडतायत म्हणून नाही तर हा लाकुडतोड्या ज्या कुऱ्हाडीने घाव घालतोय, त्या कुऱ्हाडीचं लाकूड हे माझ्या फांदीचं लाकूड आहे. त्याच्या मला वेदना जास्त होतात. हेच आज चाललेलं असल्याचं म्हणत उद्धव ठाकरे भावूक झाले होते.





