रावेतमध्ये पत्राशेडचा गोरखधंदा जोरात

रावेत  – सर्वसामान्यांना कारवाईचा धाक दाखविणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने रावेत परिसरातील बीआरटी मार्गालगतच्या अतिक्रमणांबाबत डोळेझाक करणे सुरूच ठेवले आहे. पाच ते दहा गुंठे जागेत अनधिकृतपणे शेड टाकून रातोरात भाड्याने दिले जात असताना त्याकडे “सोयीस्कर’ पणे कानाडोळा केला जात असल्याचा आरोप स्थानिक रहिवासी करीत आहेत.

शहरातील वेगाने विकसित होणारा भाग म्हणून रावेतकडे पाहिले जात आहे. प्रशस्त रस्ते, वैशिष्ट्यपूर्ण बास्केट ब्रीज, नव्याने विकसित झालेला औंध-रावेत बीआरटी मार्ग यामुळे हा परिसर आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला आहे. महापालिकेत मागाहून समाविष्ट झाल्याने या भागातील ग्रामीण बाज आजही टिकून आहे. परंतु, वाढत्या नागरीकरणाची या भागाला दृष्ट लागली आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर बांधकामे होत असताना अतिक्रमणांमध्येही वाढ होत आहे. रावेत बास्केट ब्रीजपासून ते मुकाई चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनधिकृतपणे शेड, टपऱ्या उभारण्यात आल्या आहेत. सुमारे 30 शेड या भागात आहेत. तब्बल पाच ते दहा गुंठे जागेत रातोरात शेड उभारण्यात येत आहेत.

लाखो रुपयांचे “डिपॉझिट’ घेत व्यावसायिकांना भाडेकराराने हे शेड दिले जात आहेत. महिन्याकाठी लाखोंचे भाडे यातून उकळण्याचा गोरखधंदा सुरू आहे. या परिसरात बकालपणा वाढत चालला असून रावेत परिसराचे सौंदर्य हरवत चालले आहे. सर्वसामान्य नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या महापालिका प्रशासनाचे या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

बीट निरीक्षक गेले कुणीकडे?
आपापल्या भागातील अतिक्रमणे रोखण्याची जबाबदारी महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयांवर सोपविली आहे. क्षेत्रीय कार्यालयांकडून अतिक्रमणांवर “वॉच’ ठेवण्यासाठी बीट निरीक्षकांची नेमणूक केली आहे. कामात कुचराई करणाऱ्या बीट निरीक्षकांवर कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र, रावेत परिसरात बीट निरीक्षक आहेत की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. सर्वसामान्यांचे बांधकाम सुरू असताना बांधकामाची वारंवार पाहणी करणे, त्याची छायाचित्रे काढणे, चौकशी करणे, नोटीस देणे ही कामे बीट निरीक्षक करतात. परंतु, रावेत बास्केट ब्रीज परिसरात दिवसागणिक बेकायदा शेड उभ्या राहत असताना एकाही अतिक्रमणाला नोटीस दिली नसल्याचे समजते. त्यामुळे खरोखरीच बीट निरीक्षक या अतिक्रमणांबाबत अनभिज्ञ आहेत की, त्यांच्याच “देखरेखी’ खाली हे उद्योग सुरु आहेत, असा प्रश्‍न स्थानिक रहिवासी करीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)