Junnar : उत्तरेश्वर घाटाकडे जाणारा रस्ता खचला
Junnar : प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे, तोपर्यंत नागरिकांच्या सुरक्षित ये-जा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

जुन्नर : उत्तरेश्वर जुन्नर येथील मंदिर परिसरातील दशक्रिया घाटाकडे जाणारा रस्ता पावसाळ्यात खचल्याने या मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असले, तरी कित्येक महिने उलटून देखील काम पूर्ण झालेले नसल्याने नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत असल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
जुन्नर शहरातील खालचा माळीवाडा, कुंभारआळी, ताजणेमळा आदी भागातील बहुसंख्य नागरिक उत्तरेश्वर येथील दशक्रिया घाटावर धार्मिक विधीसाठी येत असतात. तसेच उत्तरेश्वर मंदिरात दर्शनासाठी तसेच हरिनाम सप्ताह व विविध धार्मिक कार्यक्रम यासाठी येणाऱ्या भाविकांचीही या मार्गावरून ये-जा सुरू असते.
मात्र, रस्त्या खचून त्याची दुरवस्था झालेली आहे तसेच अपूर्ण अवस्थेतील बांधकाम यामुळे नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे मात्र प्रशासन या कामाकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना या मार्गावरून ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यालगतची माती खचलेली असून, बांधकाम परिसरातही सुरक्षित ये-जा करण्यासाठी पुरेशी व्यवस्था दिसून येत नाही.
त्यामुळे अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. दशक्रिया विधी हा नागरिकांच्या भावनिक आणि धार्मिक श्रद्धेशी संबंधित विषय आहे. अशा महत्त्वाच्या ठिकाणी जाणारा रस्ताच दुरवस्थेत असून कोणत्याच प्रकारची सुरक्षितता या ठिकाणी नसल्याने नागरिकां मधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मंदिरात दर्शनासाठी दररोज येणाऱ्या भाविकांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे, तोपर्यंत नागरिकांच्या सुरक्षित ये-जा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आता प्रशासन या प्रश्नाची किती गांभीर्याने दखल घेते आणि उत्तरेश्वर दशक्रिया घाटाकडे जाणारा रस्ता नागरिकांसाठी सुरक्षित व सुस्थितीत कधी उपलब्ध करून देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





