ठाणेन्हावे येथील रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात! पावसाळ्याच्या सुरूवातीलाच रस्त्याची दूर्दशा; वाहन चालक, प्रवासी हैराण

खालापूर : तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक रस्ते खड्ड्यांच्या विळख्यात अडकल्याने या खड्डेमय रस्त्यांमुळे वाहन चालक आणि प्रवासी त्रस्त झाले आहेत. खोपोली – पाली मार्गावरील ठाणेन्हावे गावाला जोडणारा मुख्य रस्ता देखील खड्ड्यांच्या विळख्यात अडकला असून पावसाच्या पहिल्याच तडाख्यात ह्या रस्त्याची अक्षरशः दूर्दशा झाली आहे. तसे पाहता गेली दोन वर्षांपासून ह्या मुख्य रस्त्याचे काम रखडले आहे. पावसाळ्यापूर्वी खड्ड्यांची सारवासारव केली जाते. पण हे तकलादू काम पहिल्याच पावसात उघडले पडले आहे.
सद्यस्थितीत ह्या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक बनले असून संबंधित प्रशासन आणि ग्रामपंचायतीने रस्त्याकडे लक्ष केंद्रीत करावे. रस्ता खड्डेमुक्त करावा, किमान पावसाळ्यात तरी चिखल, खड्डा आणि राडारोडा यांचा त्रास होणार नाही, याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे. अन्यथा पाणी साचलेल्या डबक्यात वाहन फसून कुणी निष्पाप व्यक्ती जखमी होण्याची अथवा जीवास अपाय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पाली-खोपोली मार्गाला जोडलेल्या ठाणेन्हावे गावाच्या मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने हा रस्ता अपघाताला आमंत्रण देत आहे. या रस्त्याकडे संबंधित विभाग आणि ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्याची ग्रामस्थांची संतप्त भावना आहे. रस्त्याच्या दूरावस्थेची कल्पना स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांना देऊन निधी उपलब्ध करून रस्त्याचे काम करावे, अशी मागणी केली आहे. तसेच यासाठी आमदारांकडे पाठपुरावा सुरू आहे.
– अॅड. भगवान लाले, सामाजिक कार्यकर्ते





