Nevasa News : रिक्षामुळे लागला सुगावा! मंदिरातील ती वस्तू चोरून नेणाऱ्या चोरट्यांना २४ तासांत ठोकल्या बेड्या, पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक

नेवासा : रांजणगांव (देवी) ता. नेवासा येथील सिद्धेश्वर भजणी मंडळाच्या पितळी टाळ चोरीला गेल्याची घटना नुकतीच घडलेली होती. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात अशोक बाबासाहेब चौधरी (वय ६० वर्ष) यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक धनंजय जाधव यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत या घटनेचा तपास केला.
तपासासाठी परिसरातील या घटनेचे छायांकन पोलीसांना मिळविण्याचा आदेश देवून ‘त्या’ आधारे या देवस्थानसमोर रात्रीच्या वेळी एक ऑटो-रिक्षा संशयितरित्या फिरतांना पोलीसांना आढळून आल्यामुळे ‘त्या’ रिक्षाचा नेवासा पोलीसांनी थेट शेंवगाव येथे जावून शोध लावत या पितळी टाळ चोरीतील एक महीला व पुरुषाला मुद्देमालासह २४ तासात ताब्यात घेत बेड्या ठोकल्या पोलीसांच्या चोरीच्या या तपासावर जनतेतून मोठे कौतुक केले जात आहे.
अशी केली अटक
या घटनेबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की, रांजणगांव (देवी) येथील सिध्देश्वर भजणी मंडळाच्या २२ हजार ४०० रुपये किंमतीच्या २८ पितळी टाळ चोरीला गेल्याचे घटना घडलेली होती. या घटनेचा तपास पोलीस नाईक बाबा वाघमोडे यांनी बारकाईने करत रांजणगांव (देवी) येथील घटनेच्या दिवशी राञीच्या वेळीचे छायांकण पोलीसांनी तपासून एक ऑटो – रिक्षा संशयितरित्या फिरतांना आढळून आली असता पोलीसांनी या रिक्षाचा माग थेट शेवगांवपर्यंत जावून तपास केला असता आरोपी राजू भगवान नागरे व संगिता सूर्यकांत सर्जेराव या दोन आरोपींना टाळ आणि ऑटो – रिक्षासह ताब्यात घेत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
पोलिसांचे कौतुक
सिद्धेश्वर भक्त मंडळीचे चोरीला गेलेले ‘टाळ’ नेवासा पोलीसांनी २४ तासात ताब्यात घेत आरोपींच्या मुसक्या आवळल्यामुळे भजणी मंडळातून पोलीस तपासाचे मोठे कौतुक केले आहे.




