Nevasa News : घोडेगावात चुली पेटल्या! सिलिंडरसाठी ४५ दिवसांचा वेटिंग पिरियड; नेमकं गौडबंगाल काय?
Nevasa News : नेवासा तालुक्यातील घोडेगाव परिसरात गॅस सिलिंडरचा भीषण तुटवडा; ४५ दिवसांशिवाय बुकिंगच होत नसल्याने सामान्य नागरिक आक्रमक.

Nevasa News : नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे गॅस सिलिंडरची टंचाई निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलिंडर मिळण्यात मोठा विलंब होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील कुटुंबांमध्ये स्वयंपाकाची समस्या निर्माण झाली असून महिलांना मोठी कसरत करावी लागत आहे. गॅस सिलिंडर बुकिंगसाठी 45 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच नवीन बुकिंग करण्याची सुविधा मिळत आहे.
त्याआधी कोणत्याही परिस्थितीत बुकिंग होत नसल्याचे ग्राहक सांगत आहेत. मोबाईलद्वारे किंवा अधिकृत अॅप्लिकेशनमधून बुकिंग करण्याचा प्रयत्न केला असता 25 ते 45 दिवसांचा प्रतीक्षा कालावधी दाखवला जात असून प्रत्यक्षात बुकिंगही होत नसल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. नेवासा येथील रघुजन गॅस सर्व्हिस या वितरक एजन्सीकडे संपर्क साधला असता, “बुकिंग केलेल्या ग्राहकांनाच गॅस सिलिंडर मिळेल,” असे स्पष्ट सांगितले जात असल्याचे नागरिकांनी सांगितले.
अत्यावश्यक परिस्थितीतही तातडीने गॅस सिलिंडर देण्याची कोणतीही विशेष सुविधा नसल्याने नागरिकांची अडचण आणखी वाढली आहे. गॅस सिलिंडर वेळेवर न मिळाल्याने अनेक कुटुंबांनी पर्याय म्हणून इलेक्ट्रिक शेगडीचा वापर सुरू केला आहे. काही ग्रामीण भागात नागरिकांना पारंपरिक चुली पेटवण्याची वेळ आली आहे. मोठ्या कुटुंबांमध्ये गॅस सिलिंडर लवकर संपत असल्याने नवीन सिलिंडर मिळण्यासाठी 25 ते 45 दिवस वाट पाहावी लागत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.
या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, लोकांमध्ये संतापाची भावना वाढत आहे. शासनाकडून गॅसची कोणतीही टंचाई नसल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र ग्रामीण भागात वेगळीच परिस्थिती असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.





