पिंपरी | पाणपोईचा धर्म झाला बाटलीबंद

नाणे मावळ, {अतुल चोपडे–पाटील} – सध्या उन्हाची तीव्रता कमालीची वाढली आहे. पूर्वी गावातील प्रत्येक चौका-चौकांमध्ये पाणपोई दिसायची. पारा जसजसा भडकायचा तसतशी या पाणपोईवर वर्दळही दृष्टीस पडायची. रस्त्याने जाता-येता घशाला पडलेली कोरड दूर करताना चार घोट गार पाणी घशाखाली उतरले की, हायसे वाटायचे.
मात्र आता शोधूनही या पाणपोई सापडत नाहीत. त्यामुळे तो सेवाभावाचा गारवाही अनुभवणे आता दुरापास्त होऊन बसले आहे. समाजातली सहृदयता संपली की काय? असे वाटण्याइतकी भीषण परिस्थिती आजरोजी पाहायला मिळत आहे.
आता याच सेवाभावाची जागा व्यापाराने घेतली असून, पाणपोईचा धर्म ग्रामीण भागातही बाटलीबंद झाला आहे. ग्रामीण भागातील प्रमुख रस्त्यालगत सध्या पाणपोई दिसेनासी झाल्याने वाटसरूनां तृष्णा भागविण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागत आहे.
तहानलेल्याला घोटभर पाणी पाजणे ही आपली संस्कृती आहे. त्यामुळेच ग्रामीण भागातील संस्था, संघटना, स्वयंसेवी संस्था, राजकीय संघटना सामाजिक सेवेचा भाव जपत वाटसरूंना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पुढे यायच्या. हॉटेल, चहा टपरी चालकांनी पिण्याचा पाण्याचा व्यवसाय सुरू केला आहे.
जागोजागी आता वॉटर फिल्टर उभे झाले आहेत. शुद्ध आरओचे पाणी पिणे अलीकडे फॅशन झाली असून, पाणपोईवर पाणी पिणे कमीपणाचे लक्षण समजू लागले आहेत. ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची विकत पाणी घेऊन पिण्याची परिस्थिती नसते. त्यामुळे हे लोक पाण्यासाठी हॉटेल, चहाटपरीचा आधार घेत बाटलीबंद पाण्याऐवजी माठातील पाणी पीत आपली तहान भागवीत आहेत.
क्षणभर विश्रांती अन् घोटभर पाणी
उन्हाळ्याच्या आधीपासूनच ग्रामीण भागात पाणपोईचे नियोजन केले जायचे. नागरिकांची तहान भागविण्याचे पुण्य लाभावे, या उद्देशाने सेवाभावातून हे काम केले जायचे. सर्वांना दृष्टीस पडेल, अशा जागी पेंडॉल उभा करून तिथे चार- दोन रांजणभर पाणी ठेवले जायचे, पाणी वाटपासाठी एक व्यक्तीही तिथे सेवा द्यायची, रस्त्याने फिरताना तहानलेली व्यक्ती पाणपोई दिसली की, आपसूकच क्षणभर विश्रांती घेऊन चार घोट पाणी घशाखाली उतरवायची आणि नंतरच पुढचा मार्ग धरायची.
सेवाभाव कमी झाला
काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील चौकाचौकांमध्ये पाणपोईचे हे चित्र दृष्टीस पडायचे. आज मात्र दुर्दैवाने अशा स्वरूपाचा कुठलाही उपक्रम सामाजिक सेवेच्या भावातून जपला जात नसल्याचे दिसत आहे. वास्तविक तहान कमी झालेली नाही, तरी समाजातला सेवाभाव संपत चालल्याने पाणपोयांची संख्या मात्र झपाट्याने कमी झाल्याचे दिसून येत आहे.





