नेवासा (शहर प्रतिनिधी) – नेवासा बुद्रुक येथे मुंबई (कल्याण) येथून मुलीकडे आलेली साठ वर्षीय वृद्ध महिला करोना पॉझिटिव्ह आढळल्याने नेवासा तालुका पुन्हा करोनाच्या दहशतीखाली आला आहे. या महिलेच्या नातेवाईकाने क्वारंटाईन करण्यासाठी आलेले पथक पाहताच पळ काढला, अखेर पाठलाग करून पोलीस व नागरिकांनी त्याला पकडून ताब्यात दिले.

रविवारी सकाळी या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे नागरिकांत व प्रशासनात खळबळ उडाली. प्रशासनाने तातडीने दखल घेत नेवासा बुद्रुक जिल्हा परिषद शाळेला व परिसराला तहसीलदार रुपेश सुराणा, पोलीस निरीक्षक रणजित डेरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. मोहसीन बागवान, डॉ.रवींद्र कानडे यांनी पाहणी करून उपाययोजना सुचविल्या. या महिला रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 15 व्यक्तींना कोविड केंद्रात क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यातील हायरिस्कचे 7 व लो रिस्कचे 8 असे वर्गीकरण करण्यात आले आहे.या सर्व व्यक्तींचे स्त्राव तापसणीसाठी पाठवणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी यांनी सांगितले.

क्वारंटाईन महिला रुग्ण नातेवाईकांकडे मुक्कामी

करोना पॉझिटिव्ह अहवाल आलेली महिला रुग्ण मुंबईहून आल्यानंतर क्वारंटाईन केंद्रात दाखल करण्यात आली होती. सदरच्या केंद्राजवळ या महिलेचे नातेवाईक असल्याने त्याच्याकडे ही महिला रात्री झोपण्यासाठी जात होती व पुन्हा दिवसा केंद्रांत हजर राहत असल्याची गावभर चर्चा आहे. असे असेल तर या महिला रुग्णाच्या संपर्कात किती नातेवाईक आले. या नातेवाईकांचा गावात वावर असल्याने गावातील अनेक दुकानदारांशी त्यांचा संपर्क आल्याने संपूर्ण गाव दहशतीखाली आले आहे. या अश्यम्य चुकीमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.