पुणे-ग्रामीण भागात करोनाचा वाढता संसर्गाने प्रशासन आणि नागरिक चिंतेत आहे. मात्र, त्याचवेळी या करोनातून ठणठणीत बरे होवून गेल्यांची संख्या मोठी असून, महिन्याभरात करोनामुक्त झालेल्यांचे प्रमाण तब्बल 19 टक्कयांनी वाढले आहे. मागील सहा महिन्यातील हे प्रमाण सर्वाधिक आहे. आतापर्यंत सापडलेल्या 18 हजार 164 बाधितांपैकी 12 हजार 768 बाधित करोनामुक्त झाले आहेत. ग्रामीण भागातील याचे प्रमाण 70.29 टक्के इतके असल्याचे काहीसा दिलासा मिळाला आहे. मागील चार दिवसांपासून ग्रामीणमध्येही दररोजची बाधित संख्या सहाशे ते आठशेपर्यंत पोहचली आहे. स्वॅब घेण्याबरोबरच बाधित सापडलेल्या परिसरात आणि 60 वर्षांवरील संशयीत व्यक्तींची तात्काळ रॅपीड ऍन्टीजेन टेस्ट घेत असल्यामुळे ग्रामीणमधील बाधितांची वाढत असल्याचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. 23 मार्च रोजी ग्रामीणमध्ये केवळ 3 बाधित होते. 14 एप्रिल रोजी ही संख्या 11 वर पोहचली तर त्यातील केवळ 2 बाधित करोनामुक्त झाले होते. त्यानंतर हळूहळू बाधित संख्या वाढू लागली. 30 एप्रिल रोजी 46, 17 मेला 140 तर 30 मे रोजी 304 पर्यंत बाधितांची संख्या पोहचली. त्यावेळी 122 बाधित करोनामुक्त झाले होते. याचे प्रमाण 40 टक्कयांपर्यंत होते. त्यानंतर लॉकडाऊन शिथिल झाले आणि शहरालगत असलेल्या गावांमध्ये करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला. एक महिन्यात (30 मे ते 30 जून) 304 वर असलेली बाधित संख्या 911 ने वाढून 1 हजार 215 वर पोहचली. त्यावेळी करोनातून बरे झालेल्यांचे प्रमाण 49.5 टक्के इतके होते. तर 28 जुलै हे प्रमाण केवळ दोन टक्कयांनी 51.50 इतके वाढले. मात्र, त्यानंतर बाधितांचे प्रमाण वाढले तसेच करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही वाढल्याचे दिसून येते. अवघ्या 29 दिवसात बाधित संख्या दुपटीपेक्षा अधिक 18 हजार 164 वर पोहचली. त्याचवेळे बरे झालेल्यांची संख्याही चारपट म्हणजे 12 हजार 768 इतकी झाली. तसेच बरे होण्याचे प्रमाण थेट 70.29 टक्कयांवर पोहचले.