पवना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची प्रतीक्षा
गेल्या वर्षीपेक्षा 674 मिलीमीटर पाऊस कमी धरणात दोन महिने पुरेल एवढाच पाणीसाठा
पिंपरी – गेल्या वर्षी मॉन्सूनचे आगमन वेळेवर झाले होते. परंतु जून महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणावा तेवढा पाऊस झाला नव्हता. यावर्षी देखील गतवर्षीची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे सुरुवातीपासूनच दिसत होती. परंतु गतवर्षीपेक्षाही अधिक ओढ यावेळी पावसाने दिली आहे.
गतवर्षी जून महिन्याच्या अखेरीस जोरदार पावसास सुरुवात झाली होती. यंदा मात्र अर्धा जुलै संपून गेला तरी पावसाने अद्याप जोर धरलेला नाही. रोज आकाशात ढग दाटीवाटी करुन जमा होतात आणि नागरिकांना निराश करुन परत जात असल्याचे चित्र गेल्या दीड महिन्यापासून दिसत आहे. याच परिणाम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाच्या पाणीसाठ्यावरही होताना दिसत आहे.
पिंपरी चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. गतवर्षी आजच्या तारखेला 1118 मिमी इतका पाऊस पडला होता. मात्र यावर्षी तुलनेने 674 मिलीमीटर पाऊस कमी झाला आहे. यावर्षी मान्सून वेळेत दाखल झाला असला तरी शहर व परिसरात जोरदार पाऊस झाला नाही. सध्यस्थितीत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणामध्ये दोन महिने पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहराची तहान भागविण्यासाठी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊसाची प्रतीक्षा आहे.
पिंपरी-चिंचवडकर मागील आठ महिन्यांपासून दिवसाआड पाणीकपातीला सामोरे जात आहेत.
पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने समन्यायी पाणी वाटपाचे कारण देत 25 नोव्हेंबर 2019 पासून पहिल्यांदा दोन महिन्यांसाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला होता. दोन महिन्याचा कालावधी 25 जानेवारी 2020 रोजीच संपल्यानंतर देखील दिवसाआड पाणीपुरवठा कायम ठेवण्यात आला. जोपर्यंत 30 एमएलडी जादा पाणी मिळत नाही. तोपर्यंत एकदिवसाआड पाणीपुरवठा कायम राहणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्पष्ट केले आहे. जादाचे 30 एमएलडी पाणी अद्यापर्यंत उपलब्ध झाले नाही. त्यामुळे शहरवासियांना यंदाच्या पावसाळ्यात देखील एकदिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. तसेच धरणक्षेत्रामध्ये जोरदार पाऊस पडत नसल्याने शहरात पाणीसमस्या गडद होण्याची चिन्हे आहेत.
समाधानकारक पावसाचा अभाव
पवना धरण पाणलोट क्षेत्रात 1 जून पासून आज 17 जुलैपर्यंत फक्त 444 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात केवळ तीन मिलीमीटर पाऊस झाला आहे. 1 जून पासून 6.00 टक्क्यांनी पाणी साठ्यात वाढ झाली आहे. धरणात 34.45 टक्के पाणीसाठा आहे. तर, गतवर्षी आजच्या तारखेपर्यंत 1118 मिली मीटर पावसाची नोंद झाली होती. त्यावेळी पाणीसाठा 44.53 टक्के होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पवना धरण पाणलोट क्षेत्रात तब्बल 674 मिलीमीटर कमी पाऊस झाला आहे. तर, 8 टक्क्यांनी धरणात पाणीसाठा कमी आहे. आज धरणात 34.45 टक्के पाणीसाठा असून हा पाणीसाठा दोन महिने पुरले एवढा आहे.