पुणे | पावसाने केली पालिकेची पोलखोल ; दुरुस्ती केलेल्या रस्त्यांवरच पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – गेल्या तीन दिवसांपासून शहरात संततधार पाऊस सुरू आहे. या पावसाने महापालिकेच्या रस्ते दुरुस्तीची पोलखोल केल्याचे दिसून येत आहे. महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी, तसेच जून महिन्यात झालेल्या पावसानंतर दुरुस्त केलेल्या रस्त्यांवर पुन्हा एकदा खड्डे पडले आहेत.
विशेष म्हणजे जे खड्डे दुरुस्त केले होते तिथेच पुन्हा खड्डे पडले असल्याने शहरातील वाहतुकीचा वेग मंदावला असून, अनेक भागांत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. विशेष म्हणजे शहराच्या सर्व प्रमुख रस्त्यांवर, तसेच प्रमुख चौकांत मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
त्यातच खड्डे दुरुस्तीसाठी आवश्यक असलेला महापालिकेचा येरवडा येथील हाॅटमिक्स प्लांटही बंद पडला आहे. त्यातच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात ओलावा असल्याने महापालिका कोल्डमिक्सचा वापर करत असली, तरी रस्त्यांवरील सततच्या वर्दळीमुळे पुन्हा पुन्हा खड्डे पडत आहेत. त्यामुळे पावसाळा आणखी दोन महिने शिल्लक असून, पुणेकरांचा यंदाचा प्रवासही खड़ड्यातूनच करावा लागणार आहे.




