कोरेगावच्या रिंग रोडसह वडूथ आणि वाढे येथील पुलांचा प्रश्न मार्गी

दिल्लीत चर्चा; आ. महेश शिंदे यांच्या प्रस्तावावर नितीन गडकरी यांनी केली कार्यवाही
कोरेगाव – कोरेगाव रिंगरोडसह सातारा- लोणंद महामार्गावरील वडूथ आणि वाढे येथे ब्रिटिशकालीन पुलांच्या जागी नवीन आधुनिक तंत्रज्ञानयुक्त पूल बांधण्याचे निर्देश
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी मंत्री यांनी तात्काळ आपल्या मंत्रालयाला दिले. त्यामुळे येत्या काही महिन्यात अनेक वर्ष रखडलेला वाहतुकीचा प्रश्न निकाली निघणार आहे.
कोरेगाव शहराच्या प्रस्तावित रिंग रोडसह सातारा- लोणंद मार्गाच्या विविध विषयांशी निगडित प्रश्नांसाठी आमदार महेश शिंदे यांनी शुक्रवारी नवी दिल्ली येथे ना. गडकरी यांची भेट घेतली. कोरेगाव, सातारा आणि खटाव तालुक्यात ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणावर असल्याने सुमारे 15 ते 16 साखर कारखान्यांची वाहतूक कोरेगाव शहरातून अहोरात्र सुरू असते. त्याचबरोबर कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशला जोडणारा जवळचा मार्ग कोरेगाव शहरातून जात असल्याने अवजड वाहतूक असते.
एक किलोमीटर अंतर कापण्यासाठी सुमारे तास ते दीड तास वेळ जातो. शहरात प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक महाविद्यालये महामार्गालगत असल्याने विद्यार्थ्यांना देखील मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. कोरेगाव शहरातील वाहतूक समस्या कायमस्वरूपी निकालात काढण्याच्या उद्देशाने आणि मतदारसंघातील कायम रहदारीचा सातारा- लोणंद- पुणे महामार्गावरील वडूथ येथे कृष्णा नदीवरील पूल आणि वाढे येथील वेण्णा नदीवरील पूल नव्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बांधण्यासाठीचे प्रस्ताव आ. महेश शिंदे यांनी ना. गडकरी यांनानासादर केले. कोरेगाव शहरासाठी बाह्यवळण मार्ग करणे नितांत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर गडकरी यांनी मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना बाह्यवळण मार्गाबाबत निर्देश दिले. याप्रसंगी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून प्रस्तावित असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या अनुषंगानेही चर्चा झाली.
रिंग रोड देणार कोरेगावच्या विकासाला गती
कोरेगाव ही ब्रिटिश काळापासूनची बाजारपेठ आहे. जुनी रेल्वे कोरेगाव शहरातून स्थलांतरित झाल्यानंतर शहरातील वाहतुकीचा ताण सातारा-लातूर महामार्गावर आहे. शहराचा विस्तार चारही बाजूंना झाला आहे. शहराच्या विकासामध्ये राज्य मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गाने हातभार लावला असला, तरी वाहने वाहून नेण्याची या मार्गांची क्षमता कधीच संपुष्टात आली आहे. हा महामार्ग वाढती रहदारी सहन करू शकत नाही. त्यामुळे कोरेगाव शहराला नव्याने रिंग रोड होणे अत्यंत महत्त्वाचे होते. शहराचा विकास साधून, अर्थकारण वाढवायचे असेल, तर रिंग रोडला पर्याय नाही. ही बाब लक्षात घेऊन, अत्याधुनिक यंत्रणेच्या साह्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा रिंग रोड तयार करावा, अशी मागणी आ. शिंदे यांनी ना. गडकरी यांच्याकडे केली होती.





