असंवेदनशील लोक सत्तेवर बसवल्याची किंमत जनता भोगत आहे

दिल्ली दंगलप्रकरणात चिदंबरम यांची टीका
नवी दिल्ली – दिल्लीत सीएए कायद्यावरून मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू झाला आहे. त्यावरून ज्येष्ठ कॉंग्रेस नेते चिंदरबरम यांनी मोदी सरकारवर निशाणा साधताना म्हटले आहे की आज असंवेदनशील आणि दूरदृष्टीचा अभाव असलेल्या नेत्यांना सत्तेवर बसवल्याची किंमत लोक भोगत आहेत. केंद्र सरकारने सीएए कायद्याच्या संबंधात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत सीएए कायदा स्थगिती ठेवावा अशी सुचनाही त्यांनी केली आहे. दिल्लीत सोमवारी झालेली दंगल अत्यंत धक्कादायक असून त्याचा निषेधच केला पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे.
चिदंबरम म्हणाले की भारतात 1955 च्या नागरीकत्व कायद्याला भारतातील लोकांनी मान्यता दिली होती व त्यावर ते समाधानी होते, पण आजच या सरकारला त्यात बदल करण्याची बुद्धी का सुचली असा सवाल करून त्यांनी म्हटले आहे की यामुळे जर सामाजिक अस्वस्थता निर्माण होत असेल तर सरकारने त्या कायद्याचा आग्रह सोडून दिला पाहिजे.
अजूनही उशिर झालेला नाही. सरकारने सीएए विरोधकांशी चर्चा केली पाहिजे, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येई पर्यंत सीएए स्थगित ठेवला जाईल अशी घोषणा सरकारने केली तर स्थिती नियंत्रणात येऊ शकते असे ते म्हणाले. ते म्हणाले की या दुरूस्ती मुळे समाजात दुफळी माजेल असा इशारा आम्ही दिला होता पण सरकारचे कान बहिरे झाले असल्याने त्यांना आमचा हा इशारा समजलाच नाही.





