आंदोलनाला उत्तर आंदोलनानेच देणार; मुरलीधर मोहोळ यांचा इशारा

पुणे -पुण्याच्या विकासाच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे. पण, केवळ वैयक्तिक आकसातून शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) आणि कॉंग्रेसकडून मोदी यांच्याविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. ही आंदोलने पोलिसांकडून थांबविण्यात यावीत अन्यथा भाजपकडून या आंदोलनाला उत्तर आंदोलनानेच दिले जाईल, असा इशारा भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिला आहे.
यावेळी राजेश पांडे हे देखील उपस्थित होते. विरोधकांकडून केली जाणारी ही आंदोलने म्हणजे नौटंकी आहे. एकीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान सोहळ्यात कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. तरीही या पक्षाकडून आंदोलन केले जात आहे, तर दुसरीकडे कॉंग्रेस कुटुंब असलेल्या टिळक घराण्याकडून जो पुरस्कार दिला जात आहे, त्याला कॉंग्रेस विरोध करीत आहे.





