पाणीसाठा नियोजनाचा प्रस्ताव 5 वर्षांपासून दरबारातच

पुणे : जलसंपदा विभागाकडून धरणांतील उपलब्ध पाणीसाठ्याचे शेती व पिण्यासाठी नियोजन केले जाते. त्यानुसार दि.15 जुलैपर्यंत पाणीसाठा पुरेल असे नियोजन करून पाणीवाटप करण्यात येते. मात्र, मागील काही वर्षांपासून मान्सून लांबणीवर जात आहे. पाऊस उशिरा येत असल्याने खडकवासला प्रकल्पामधील धरणांत 15 जुलैपर्यंत मुबलक पाणीसाठा होत नाही. त्यामुळे पाणीकपातीला सामोरे जावे लागते. या सर्व पार्श्वभूमीवर उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन 31 जुलै किंवा ऑगस्ट अखेरपर्यंत करण्यात यावे, असा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडून राज्य शासनाकडे 5 वर्षांपूर्वीच पाठवला आहे. मात्र, या प्रस्तावावर अद्यापही निर्णय झालेला नाही, अशी माहिती जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
धरणात दि.15 ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध असलेला पाणीसाठा विचारात घेऊन कालवा समितीच्या बैठकीत दि.15 जुलैपर्यंत शेतीला व पिण्यासाठी किती पाणी द्यायचे या निर्णय घेतला जातो. त्यानुसार पाण्याचे वाटप होते. दि. 7 जूननंतर पावसाळा सुरू होतो. धरण परिसरात चांगला पाऊस झाल्यानंतर धरणात ओढ्या-नाल्यांद्वारे पाणी जमा होण्यास सुरुवात होते. वेळेत पाऊस सुरू झाल्यास जुलैपर्यंत पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ दिसून येते. आता मात्र जूनअखेर होत आली, तरी खडकवासला प्रकल्पातील धरण परिसरात चांगला पाऊस झालेला नाही. सध्या धरणसाखळीत अवघा 9.34 टक्के म्हणजे 2.72 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर पाण्याचे नियोजन योग्य व्हावे, मान्सून लांबणीवर पडला तरी नागरिकांना पाणीकपातीला सामोरे जाऊ लागू नये, यासाठी दि. 31 जुलै किंवा ऑगस्ट अखेरपर्यंत धरणातील पाण्याचे नियोजन करण्यात यावे, असा प्रस्ताव जलसंपदा विभागाने तयार करून मागील पाच वर्षांपूर्वीच शासनाकडे पाठविला आहे. हा निर्णय धोरणात्मक व सर्व राज्यभरासाठी लागू होणार आहे. त्यामुळे त्यावर राज्य स्तरावरूनच यावर निर्णय होणे अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले.





