निळवंड्याच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान येणार

संगमनेर – निळवंडे उजव्या कालव्याचे काम महिनाभरात पूर्णत्वाला जात असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धरणासह कालव्याच्या उद्घाटनाचे निमंत्रण दिले आहे. डाव्या कालव्याप्रमाणेच उजव्या कालव्याचे कामही पूर्णत्वास नेणे हीच खरी कै. रखमाजी पाटील खेमनर यांना श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
डिग्रसचे माजी सरपंच ज्येष्ठ नेते (कै.) रखमाजी पाटील खेमनर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्री विखे बोलत होते. ते म्हणाले की, या भागाचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटण्यासाठी कै. खेमनर सातत्याने आग्रही होते. यासाठीच आठ कोटी रुपयांची पाणीयोजना त्यांच्या पाठपुराव्यातून या गावांसाठी मंजूर झाली. निळवंडे उजव्या कालव्यांचे कामही पूर्ण करण्यासाठी त्यांची असलेली इच्छा पूर्ण करणे हीच खरी श्रद्धांजली त्यांना ठरणार असल्याचे विखे पाटील म्हणाले.
मंत्री विखे पाटील म्हणाले की, धरणाच्या डाव्या कालव्याचे काम पूर्ण झाले आहे. येत्या पंधरा दिवसांत तपासणी होणार असून, उजव्या कालव्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे. यासाठी उभारावे लागलेले सेतूचे कामही पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. खेमनरांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांचे चिरंजीव अशोक यांनी ती पोकळी भरून काढावी आणि समर्थपणे या परिसरात त्यांचा वारसा पुढे चालवावा, असे विखे पाटील म्हणाले.
या वेळी ऍड. सदाशिवराव थोरात म्हणाले की, डिग्रस परिसरात निळवंडेचे पाणी यावे म्हणून अख्खे आयुष्य खेमनर पाटलांनी पणाला लावले. आता खऱ्या अर्थाने निळवंड्याच्या कालव्याचे पाणी या परिसरात मिळणे हीच त्यांच्या दृष्टीने त्यांना श्रद्धांजली ठरेल.





