राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – आज मला बरे वाटते, राक्षेवाडीमधील मंदिर नागरिकांनी भरत नव्हते, ते आज भरले आहे. बहुतेक त्यांच्यावरचे दडपण बाजूला झाले आहे म्हणून, मी एवढेच सांगेल की मी तुमच्या मागे आहे. असा उपरोधक टोला बाजार समितीचे संचालक व आमदार मोहिते यांचे कट्टर समर्थक असलेल्या परंतु आता विरोधी गटात गेलेल्या अशोक राक्षे यांना आमदार मोहिते यांनी लगावला. त्यांच्या या वक्तव्यावर ग्रामस्थानी टाळ्या वाजवल्या. आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा जनसंवाद दौरा सोमवारी (दि. 7) तालुक्यातील मांजरेवाडी, होलेवाडी, टाकळकरवाडी, राक्षेवाडी, ढोरेभांबुरवाडी, वरची भांबुरवाडी, तुकाईवाडी, जैदवाडी येथे झाला. या दौर्यात आमदार मोहिते पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन झाले. जनसंवाद दौर्यात राक्षेवाडी येथे नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते. ते म्हणाल की, अशोक राक्षे यांना दोन वेळा बाजार समितीवर संचालक केले. उपसभापती केले आणि आता अशोकदादाचे कुठे बिघडले ते कळले नाही. एवढं सगळं करूनही माणसे चुकीचे वागत असतील तर कुठे तरी विचार करण्याची वेळ आली आहे. मला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचे असते. काही चर्चा आणि चुकीच्या तडजोडी झाल्याने त्यांनी वेगळा विचार केला. एकट्या माणसाच्या नावाने गावात कामे केली नाहीत सर्वांचा विचार आणि समस्या लक्षात घेत राक्षेवाडीत निधी दिला. राक्षेवाडी गावातील सर्व प्रश्न मार्गी लावले जातील, विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही. गावठाणचा प्रश्न प्रांत अधिकार्यांसोबत बैठक घेऊन समोरासमोर मार्गी लावू, असे आश्वासन त्यांनी दिले. हे प्रश्न मार्गी लावणार राजगुरूनगर शहर सुुंदर आणि स्वच्छ करणार आहे. येथील कचरा डेपो हटविण्यात येणार आहे. पोलीस स्टेशन शहरात जाणार असल्याने जुने पोलीस स्टेशन इमारत पाडून तेथे सुसज्ज स्मशानभूमी केली जाणार आहे. एसटी महामंडळ आवारातून राक्षेवाडीसाठी रस्ता केला जाणार आहे त्या जागेच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांनी आजच सही केल्याने हा प्रश्न लवकरच सुटणार असून रस्ता तयार होणार आहे. एसटी बस स्थानकात होणार्या महाविद्यलयीन विद्यार्थिनी, महिलांची छेडछाड आणि महिलांचे दागिने चोरणार्या टोळ्यांवर आळा घालण्यासाठी एसटी बस स्थानकाशेजारी पोलीस चौकी उभारण्यात येणार आहे. मी काम करणार माणूस आहे. खोटी आश्वासने देत नाही पाच वर्षे सगळ्यांसाठी काम केले कोणताही दुजाभाव केला नाही. निवडणुका आल्या की कधीतरी साड्या वाटप करून धूमकेतू सारखे येणार्या आणि खोटी आश्वासने देणार्यांना थारा देऊ नका, असे आवाहन आमदार मोहिते यांनी केले.