कोलोंबो – श्रीलंकेच्या इतिहासात गेल्या 44 वर्षांत प्रथमच अध्यक्षांची निवड थेट संसदेतून करण्यात येणार आहे. अखेरच्या मिनिटापर्यंत घडलेल्या घडामोडींनुसार अध्यक्षपदासाठी विद्यमान काळजीवाहू अध्यक्ष रनिल विक्रमसिंघे आणि सत्तारुढ पक्षातील बंडखोर नेते डल्लास अलाहापेरुमा यांच्यातच तुरस होण्याची शक्यता आहे. अलाहपेरुम्मा यांना सत्तारुढ पक्षाबरोबर त्यांच्या पक्षातूनही मोठा पाठिंबा आहे. प्रमुख विरोधी पक्ष ‘एसजेबी’चे नेते प्रेमदासा यांनी मंगळवारी अलाहपेरुमाच्या बाजूने पाठिंबा दिला. त्यामुळे अध्यक्षपदाच्या शर्यतीत चौघांऐवजी तीनच उमेदवार उरले आहेत.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी विक्रमसिंघे, अलाहापेरुमा आणि जनता विमुक्ती पेरामुला (जेव्हीपी) या पक्षाचे नेते अनुरा कुमारा दिसानायके या तिघांच्या नावांची शिफारस आज संसद सदस्यांकडून करण्यात आली. अध्यक्षपदासाठी सत्तारुढ श्रीलंका पोदुजना पेरामुना पक्षाच्या बहुसंख्य सदस्यांचा अलाहापेरुमा यांच्या नावाला पाठिंबा आहे. तर प्रमुख विरोधी नेते सजित प्रेमदासा यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा आहे, असे एसएलपीपीचे अध्यक्ष जी एल पेरीस यांनी सांगितले.
Sri Lanka Crisis : श्रीलंकेत परिस्थिती बिघडली, भारतीय अधिकाऱ्यावरही झाला हल्ला
मात्र यामध्ये विक्रमसिंघे हेच आघाडीवर असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. त्यांची निवड होणे अवघड आहे, असे संसदेतील 225 सदस्यांपैकी कोणीही म्हटलेले नाही. सत्तारुढ “एसएलपीपी’ पक्षाच्या पाठिंब्याशिवाय विक्रमसिंघे यांचा विजय अशक्य आहे. कारण संसदेमध्ये त्यांच्याकडे केवळ त्यांची एकच जागा आहे. “एसएलपीपी’ पक्षाच्या एकूण 145 सदस्यांपैकी आता मूळ पक्षाचे 52 सदस्य फुटून वेगळे झाले आहेत. 225 सदस्यांच्या सभागृहात 113 चा जादुई आकडा पार करण्यासाठी विक्रमसिंघे यांना आणखी 16 मतांची गरज आहे.