Pune District : दिवे आणि भिवडी गणाकडे सभापती पद

बेलसर : पुरंदर तालुक्यातील पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने सभापती आणि सदस्य पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. मागील जवळपास तीन वर्ष निवडणूक निवडणुक झाली नसल्याने मागील आरक्षणे विचारात घेतली गेली नाहीत ती शिथिल करण्यात आली. पुरंदर पंचायत समिती साठी आठ गण आहेत. दिवे, गराडे, निरा, कोळविहिरे, बेलसर, माळशिरस, वीर, भिवडी असे आठ पंचायत समिती गण आहेत.
आठ पंचायत समिती सदस्य आणि सभापती पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यामध्ये सर्वात प्रथम सभापती पदाची सोडत काढण्यात आली तर सभापती पद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पंचायत समिती गणांच्या आरक्षणामध्ये ज्या गणांना ओबीसी हे आरक्षण राखीव असेल तो पंचायत समिती सभापतीपदी विराजमान होईल हे स्पष्ट झाले.
सोमवार (दि. १३) रोजी पंचायत समिती येथे पंचायत समिती प्रशासक आणि पुरंदर उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत आणि गटविकास अधिकारी पुरंदर प्रणोती श्रीश्रीमाळ यांच्या उपस्थितीत आठही गणांची आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यामध्ये दिवे गणास ओबीसी सर्वसाधारण आणि भिवडी गणांमध्ये ओबीसी महिला आरक्षण सोडत निघाली त्यामुळे आता दिवे आणि भिवडी पंचायत समिती गणांमधून सभापती ठरणार हे सिद्ध झाले आहे आहे.
सभापतीपदी कोणाची वर्णी लावणार ?
मागील पंचायत समिती पंचवार्षिक मध्ये म्हणजेच २०१७ मध्ये दिवे आणि भिवडी गणाचे सदस्य हे सभापती पदी विराजमान झाले होते. तर या दोनही गणातील जागा शिवसेना (धनुष्यबाण) यांनी जिंकल्या होत्या. प्रामुख्याने दिवे गणातील अर्चना समीर जाधव तर भिवडी गणातील नलिनी हरिभाऊ लोळे या सभापतीपदी विराजमान झाल्या होत्या. तर यंदाही दिवे आणि भिवडी गणाला सभापती पदाची संधी आहे. आता सभापती पदी कोण वर्णी लावणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.





