पुणेः कसबा विधानसभेचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पुण्यातील भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून त्यांच्या पक्ष प्रवेशावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कसबा विधानसभा मतदार संघातील राजकीय वातावरण चांगलचं तापल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याचे बोलले जात आहे. अशातच आता धंगकरांच्या समर्थकांनी त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बॅनरबाजी केली आहे. या बॅनरची मोठी चर्चा होत असून भाजपचे आमदार हेमंत रासने यांना डिवचण्याचा प्रयत्न या बॅनरमधून करण्यात आल्याचे बोलले जात आहे. या बॅनरमध्ये धंगेकरांच्या समर्थकांनी जनतेच्या मनातील आमदार असा उल्लेख केला आहे. यातून आमदार हेमंत रासनेंना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकारामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे. पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील धंगेकरांना भाजपमध्ये घेतले असते तर मी भांडलो असतो, असे म्हणत आमच्या पक्षाचे कार्यकर्ते काही बोलत असतील तर ते त्यांचे अनुभवातून आलेले मत असल्याचे पाटील म्हणाले होते. एकप्रकारे त्यांनी नाराज भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची पाठराखण केली होती. आगामी निवडणुकीत महायुतीतील संघर्ष वाढणार? धंगेकरांच्या समर्थकांनी वाढदिवसाच्या निमित्ताने बॅनरमधून जनतेच्या मनातील आमदार असा उल्लेख केल्याने याची मोठी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. धंगेकरांच्या पक्ष प्रवेशाने ते महायुतीचा एक घटक पक्ष असलेल्या शिवसेनेत आले आहेत. म्हणजेच ते आता महायुतीचा एक भाग झाले आहेत. कसबा विधानसभेत भाजपचा आमदार आहे. आमदार हेमंत रासने हे या मतदार संघाचे प्रतिनिधित्त करत आहेत. धंगेकर शिवसेनेत येण्यापूर्वी धंगेकर विरुद्ध रासने अशी लढत विधानसभेत झाली होती. आता पुण्यातील महायुतीतील संघर्ष आगामी निवडणुकीत वेगळे वळण घेणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.