‘त्या’ भारतीय तरुणीच्या मृत्यूवर हसणारा पोलीस अखेर बडतर्फ

न्यूयॉर्क : भारतीय तरुणीच्या अपघाती मृत्यूवर फिदीफिदी हसणारा पोलीस अधिकारी अखेर बडतर्फ झाला आहे. जान्हवी कंदुला असे अपघातात मरण पावलेल्या 23 वर्षीय भारतीय विद्यार्थिनीचे नाव होते. गेल्या वर्षी २३ जानेवारीला केविन डेव चालवत असलेल्या पोलिसांच्या कारने धडक दिल्यामुळे तिचा जागेवरच मृत्यू झाला होता.
त्यावेळी कारमध्ये असलेला सिएटल पोलीस दलातील अधिकारी डॅनिएल ऑडरर हा त्यावेळी फिदीफिदी हसला होता. केवळ ११ हजार डॉलरची भरपाई दिली जाऊ शकेल. कारण २६ वर्षांच्या या मुलीच्या आयुष्याचे मोल तेवढेच होते, असे असंवेदनशील उद्गार त्याने काढले होते. त्याचे हे बोलणे बॉडीकॅममध्ये रेकॉर्ड झाले होते. या प्रसंगामुळे संतापाची लाट निर्माण झाली होती.
जान्हवी कंदुलाच्या कुटुंबीयांना या घटनेमुळे झालेल्या वेदना भरून निघू शकत नाहीत. यामुळे सिएटल पोलिसांची झालेली नाचक्की भरून न येणारी आहे. त्यामुळे ऑडरर याला या पोलीस दलात राहू दिले जाऊ शकत नाही, असे सिएटलचे प्रभारी पोलीस प्रमुख सू राहर यांनी म्हटले आहे.





