पुणे | पीएमपी “गो’ ॲपला अखेर दि. १ मे चा मुहूर्त

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) तयार करण्यात आलेले “पीएमपी गो’ नावाचे मोबाइल ॲप येत्या दोन आठवड्यांत प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना घरबसल्या ऑनलाइन तिकीट काढता येणार आहे. त्याचबरोबरच पीएमपीच्या मार्गाची व सध्यस्थिती बस कुठे याची माहिती प्रवाशांना मिळणार आहे.
पीएमपीकडून प्रवाशांना वेगवेगळ्या सुविधा देण्याच्या प्रयत्न केला जात आहे. पीएमपीकडून प्रवासी सेवेसाठी बस वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहेत. पीएमपीमधील प्रवाशांसाठी नुकतीच ऑनलाइन तिकीटाची सोय करण्यात आली आहे. क्यूआर कोडच्या माध्यमातून प्रवाशांना तिकीट काढता येत आहे.
त्याचा फायदा होत असून सुट्ट्या पैशांची अडचण दूर होत आहे. आता प्रवाशांना घर बसल्या तिकीट काढता यावे, बसचा मार्ग समजावा, यासाठी पीएमपी गो नावाने ॲप तयार करण्यात आले आहे. हे ॲप आता शेवटच्या टप्प्यात असून, नुकत्याच झालेल्या बैठकीत काही त्रुटींवर अंतिम निर्णय घेऊन प्रायोगीक तत्वावर हे ॲप सुरू होणार आहे.
प्रवाशांच्या सोईसाठी दि. 1 मे रोजी गो पीएमपी नावाचे ॲप सुरू केले जाणार आहे. काही तांत्रिक त्रुटी दूर झाल्यानंतर हे ॲप प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. याद्वारे प्रवाशांना घरबसल्या तिकीट काढता येणार आहे. तसेच, या ॲपमध्ये इतरही सुविधा असणार आहेत. नितीन नार्वेकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल
असा होणार ॲपचा उपयोग
– ॲपच्या माध्यमातून बसची रिअल टाइम माहिती मिळणार
– ज्या बसने जायचे, त्या बसचे शेड्युल पाहून घरबसल्या किंवा कामाच्या ठिकाणावर तिकीट काढता येणार
– वाहकाला स्कॅनर दाखवताच तिकीट आपल्या हातात मिळेल
– ॲपवर सोशल मीडियाचे सर्व प्लॅटफॉर्म उपलब्ध असतील
– पीएमपीच्या सर्व मार्गांची माहिती देखील असणार
– विविध प्रवासी पास ऑनलाइन काढण्याची सोय





