पुणे – राज्यात एकविसाव्या पशुगणनेची सुरवात आजपासून (दि. २५) करण्यात आली. मोबाइल ॲपच्या माध्यमातून सदर पशुगणना करण्यात येत आहे, प्रत्येक पाच वर्षांनी पशुगणना करण्यात येते, असे पशुसंवर्धन आयुक्तालयाचे सहसंचालक सुषमा जाधव यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य पशुधनामध्ये संपन्न राज्य आहे. देशात सातव्या क्रमांकावर आपले राज्य आहे. यासह कुक्कुट व कुक्कुट पक्षी यामध्ये पाचव्या क्रमांकावर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. पशुधनाच्या विकासासाठी आणि चांगल्या योजना आखण्यासाठी पशुगणना महत्त्वाची ठरते. पशुपालन पूरक उत्पन्ननिर्मिती बरोबरच दूध, अंडी व मांस ही पशुधन उत्पादने पोषक आहाराचा महत्त्वाचा स्रोत असल्याने प्रत्येक पाच वर्षांनी पशुगणना करण्यात येत आहे. २०१९ मध्ये विसाव्या पशुगणनेमध्ये प्रथमच प्रजाती व ग्रामीण आणि नागरी क्षेत्रनिहाय पशुधनाची आकडेवारी गोळा करण्यात आली. विसाव्या पशुगणनेच्या अहवालानुसार राज्यात एकूण तीन कोटी ३० लाख ८० हजार पशुधन असून, मागील पशुगणनेच्या तुलनेत १.८३ टक्क्यांची वाढ झाली आहे. या वेळच्या पशुगणनेच्या माध्यमातून राज्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रनिहाय कुटुंब, कौटुंबिक उपक्रम, बिगर-कौटुंबिक उपक्रम आणि संस्था, गोशाळा यांच्याकडे असलेल्या आणि राज्यात आढळणाऱ्या १६ पशुधन प्रजाती व कुक्कुट पक्षी यांची जाती निहाय, वयोगट तसेच लिंगनिहाय आकडेवारी गोळा केली जाणार आहे. ही पशुगणना नोव्हेंबर ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत होणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.