Pimpri : इंद्रायणीनगरमधील क्रीडा संकुलांची दुर्दशा

भोसरी : प्रभाग क्रमांक ८ अंतर्गत येणाऱ्या इंद्रायणीनगर सेक्टर नं. २ मधील संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुल सध्या दयनीय अवस्थेत आहे. येथील बॅडमिंटन हॉलमध्ये कबुतरांची वस्ती आणि विष्ठेचा साठा यामुळे खेळाडूंना डेंग्यू, चिकनगुणिया व इतर संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
पावसाळ्यामुळे हॉलमध्ये कायमचा ओलावा असून कोर्टवर घसरून खेळाडूंना दुखापत होण्याचे प्रकार वाढले आहेत. महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.याशिवाय, मोशी प्राधिकरणातील सेक्टर ४ येथील टेनिस कोर्ट, सेक्टर ९ मधील बास्केट बॉल मैदान, तसेच सेक्टर १० मधील हॉकी ग्राउंड व आर्चरी केंद्राचीही अवस्था बिकट आहे. वाढलेले गवत, साचलेले पाणी व कचऱ्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून, आरोग्य धोक्यात आले आहे.
‘स्मार्ट सिटी’च्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली ही क्रीडा केंद्रे सध्या रखडलेली असून योग्य देखभालीअभावी नागरिकांचा पैसा वाया जात आहे. खेळाडूंनी व नागरिकांनी क्रीडा आणि आरोग्य विभागाने तातडीने कारवाई करून स्वच्छता मोहीम राबवावी, अशी जोरदार मागणी केली आहे. अन्यथा या ठिकाणी आरोग्यसंकट ओढवेल, असा इशाराही देण्यात आला आहे.





