विमान उंच आकाशी, प्रशासन मात्र आळशी

सागर येवले
पुणे – लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे नव्याने बांधण्यात आलेल्या टर्मिनलचे उद्घाटन नक्की अपूर्ण कामामुळे राहिले, की “लालफितीत’ अडकले? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. नवीन टर्मिनलच्या उद्घाटनाची “तारीख पे तारीख’ सुरू असल्याने नवीन टर्मिनल कधी खुले होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पुणे विमानतळावरून प्रवासी संख्या वाढल्यामुळे उड्डाणांची संख्याही वाढविण्यात आली आहे. दिवसाला साधारण 180 ते 190 विमाने उड्डाण करतात. तर 28 ते 30 हजार प्रवासी दिल्ली, गोवा, मुंबई यासह अन्य ठिकाणी प्रवास करतात. त्यामुळे सध्याचा ताण कमी करण्यासाठी जवळपास 60 हजार चौरस फूट (सहा एकर) जागेवर नवीन टर्मिनल तयार केले जात आहे. यासाठी 525 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
हे काम सप्टेंबर 2023 अखेरपर्यंत पूर्ण होईल. तसेच सप्टेंबरअखेर किंवा ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात टर्मिनलचे उद्घाटन होणार असल्याचे विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी सांगितले होते. मात्र, आता ऑक्टोबर महिनाही संपला तरी अद्याप उद्घाटनाची “लाल फित’ प्रतिक्षेत आहे.
दरम्यान, “काम पूर्ण होत आले, महिनाभरात काम संपेल आणि उद्घाटन होईल’ असे सांगणारे अधिकारी दोन महिन्यानंतरही “काम सुरूच आहे,’ असे सांगत अधिक बोलण्याचे टाळत आहेत. याचा फटका प्रवाशांना बसत आहे. विमानतळ प्रशासनाने नवीन टर्मिनलच्या उद्घाटनासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मागितली आहे. मात्र, टर्मिनलचे काम वेगाने करण्याकडे प्रशासनाचे लक्ष दिसत नाही. आता राहिलेली कामे गतीने केली, तर डिसेंबरमध्ये उद्घाटन होईल. अन्यथा प्रवाशांना नवीन वर्षाची वाट पहावी लागणार असल्याची चिन्हे सध्या दिसून येत आहेत.
मराठमोळ्या संस्कृतीचे होणार दर्शन
प्रवाशांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सेवा या टर्मिनलमध्ये मिळणार आहे. टर्मिनलच्या प्रवेशद्वारावर कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील भवानी मंडळ, न्यू पॅलेसच्या प्रतिकृती साकारण्याचे काम सुरू आहे. तसेच इमारतीच्या बाहेरील बाजूस पुण्याच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतीक असलेला शनिवारवाडा, गणेशोत्सव आदी चित्रे रेखाटली आहेत. नव्या टर्मिनलवरून प्रवास करताना मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडणार आहे.
प्रवाशांना मिळणार या सुविधा
- गर्दी नियंत्रणासाठी सेन्सरचा वापर.
- प्रवाशांचे साहित्य तपासण्यासाठी वेळ वाचावा म्हणून नव्या प्रणालीचा वापर.
- प्रवाशांना रांगेत उभे रहावे लागणार नाही. तर साहित्य एक्स-रे मशिनमधून बेल्टवर घेऊन जावे लागणार नाही. हे काम नवीन मशिन करेल.
- प्रवाशांना आराम करण्यासाठी कक्ष
- कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी स्कायलाइटचा वापर
- लहान मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आणि उपहारगृह
असे असेल नवे टर्मिनल
- प्रवेशद्वारांची संख्या : 6
(आगमन व निर्गमन) - साहित्यासाठी बॅगेज बेल्ट : 5
- चेक इन काउंटरची संख्या : 34
- एरोब्रिज : 5
- पहिला मजला : प्रवाशांना थांबण्यासाठी हॉल
- एरोब्रिजला जोडणारे बोर्डिंग ब्रिज : 5
क्षेत्रफळ : सुमारे 6 एकर - प्रवासी क्षमता : वर्षाला कोटीहून अधिक
- एकूण खर्च : 525 कोटी रु.
- प्रतितास प्रवासी क्षमता : 2,300





