बारामतीत एसटीच्या ‘प्रवासी वाढवा’चा फज्जा

वाहक-चालकांचा मनमानी कारभार : थांब्यावरही बस थांबवतच नाही

– तुषार धुमाळ

वाघळवाडी – ग्रामीण भागाची दळणवणाची वाहिनी म्हणून “एसटी’ची ओळख आहे. त्यामुळे ग्रामीण भागात बसच्या अनेक फेऱ्याही होतात त्याचा गावागावातील नागरिक, चाकरमानी, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना फायदा होतो. त्यातच प्रवासी वाढवण्यासाठी एसटी महामंडळाकडून विविध योजना राबवल्या जातात. त्यातच अनेक वर्षांपासून “हात दाखवा, गाडी थांबवा’ यांसारख्या योजना राबविण्यात येते. मात्र, बारामती तालुक्‍यातील अनेक गावांत या योजनेला “चालक-वाहकां’कडून हारताळ फासले आहे, शिवाय आता ते थांब्यावरही बस थांबवत नसल्याने चालक-वाहकांच्या मनमानी कारभाराला प्रवासी वैतागले असून ते आंदोलनाच्या तयारीत आहे.

पुणे शहरानंतर बारामती तालुका शैक्षणिक हब म्हणून ओळखला जातो. तालुक्‍यामधील मुख्य गावांमध्ये विविध शैक्षणिक संस्था आहेत, त्यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सकाळी 8 ते 10 वेळेत लक्ष्मीनगर, निंबूत, खंडोबाचीवाडी, फरांदेनगर, निंबूत छपरी, वाघळवाडी, रेणुकानगर येथील थांब्यांवर एसटीची वाट पाहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, बसचालक वाहक थांब्यावर बस थांबवत नसल्याने प्रवासी वैतागले आहे. त्यामुळे प्रवाशांना नाईलाजास्तव खासगी प्रवासी वाहनांचा पर्याय निवडावा लागतो. तर हे खासगी वाहनचालही आडलेल्या प्रवाशांची अडवणूक करतात, त्यामुळे एसटी महामंडळाच्या वाहक-चालकांचा मनमानी कारभार थांबला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा परिसरातील प्रवाशांनी दिला आहे.

मग पासचा काय उपयोग
“ड्रायव्हर काका प्लीज, एसटी थांबवत जा’ अशी विनंती करण्याची वेळ आमच्यावर आली आहे. महाविद्यालय, शाळांमध्ये महत्त्वाच्या विषयाचे लेक्‍चर असतात, पण विनंती करूनही एसटी थांबत नाही. मग एसटीचा पास काढून काय उपयोग? अशा प्रतिक्रिया नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी दिली.

नीरेकडून येणाऱ्या एसटी बसेसमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी जागा असताना सुद्धा काही चालकांकडून एसटी थांब्यावर थांबवल्या जात नाही. आणि थांबविल्या तरी लांब थांबवतात. त्यामुळे बसपर्यंत पोहोचतपर्यंत चालक बस चालू करून सुसाट सुटतो. त्यामुळे प्रवाशांची अशी अवहेलना, चेष्टा खपवून घेतली जाणार नाही. ही पद्धत जर त्वरीत बदलली नाही तर आम्ही सर्व प्रवासी मिळून रस्त्यावर बसून निषेध करू.
– शिवाजी काकडे, प्रवासी, निंबूत


नीरा -बारामती ही एसटी मार्गावर प्रत्येक थांब्यावर थांबली पाहिजे. जर कोणताही चालक किंवा वाहक एसटी थांब्यावरती एसटी थांबवत नसेल तर प्रवाशांनी त्याबद्दलची लेखी तक्रार आगार प्रमुखांकडे करावी .त्यानंतर लगेच कारवाई केली जाईल.
– अमोल गोंजारी, आगार प्रमुख, बारामती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)