मुंबई : राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे. मुख्यमंत्रीपदापेक्षा राज्यातील महायुतीचे सरकार घालवणे हेच आमचे पहिले लक्ष आहे. उद्या मतदान झाल्यानंतर हायकमांड जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. आमचे सरकार स्थापन होणार असून अपक्षही आम्हाला मिळतील, असा दावा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. तसेच उद्या बारापर्यंत पिक्चर क्लिअर होईल, असेही ते म्हणाले. विधानसभेच्या निकालाआधी काँग्रेसच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. महाराष्ट्रामधील काँग्रेस नेत्यांची महत्वाची मिटिंग पार पडली. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात आदी नेते यावेळी उपस्थित होते. यावेळी थोरात बोलत होते. दुसरीकडे महाविकास आघाडीला 175 च्या आसपास जागा मिळतील आणि काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरेल, असा दावाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्रीपदाबाबत उद्धव ठाकरे,शरद पवार यांच्याशी बैठक झाल्यानंतरच चर्चा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.