Priyanka Gandhi : प्रियंका यांच्या विरोधातील याचिका केवळ प्रसिद्धीसाठी; कॉंग्रेसने केले जाहीर

नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या लोकसभेवरील निवडीला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. मात्र, त्या संदर्भातील याचिकेला फारसे महत्व देण्याचे पक्षाने टाळले. केवळ प्रसिद्धीसाठी ती याचिका दाखल करण्यात आल्याचे कॉंग्रेसने म्हटले. केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघात महिनाभरापूर्वी पोटनिवडणूक झाली.
त्यामध्ये बाजी मारून प्रियंका प्रथमच खासदार बनल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार आणि भाजपच्या नेत्या नव्या हरिदास यांनी केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. प्रियंका यांनी उमेदवारी अर्जासमवेत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिली. त्यांनी स्वत:च्या आणि कुटूंबीयांच्या संपत्तीचा योग्य तपशील उघड केला नाही. त्यांची निवड रद्द केली जावी, अशी मागणी नव्या यांनी याचिकेतून केली.
त्या घडामोडीवर कॉंग्रेसचे नेते प्रमोद तिवारी यांनी प्रतिक्रिया दिली. नव्या यांची याचिका फेटाळली जाईल. त्याशिवाय, त्यांना दंडही ठोठावला जाईल, अशी टिप्पणी त्यांनी केली. तर, भाजपला याचिका दाखल करण्याचा अधिकार आहे. मात्र, सत्य आमच्या बाजूने आहे, असे कॉंग्रेसचे आणखी एक नेते मणिकम टागोर यांनी म्हटले.





