नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याची ओळख पटली, पोलिसांचे पथक बेळगावला रवाना

नागपूर – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शनिवारी फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर एकच खळबळ माजली होती. या धमकीनंतर नागपूर पोलिसांनी अवघ्या काही तासांत धमकी देणाऱ्या आरोपीचा शोध लावला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, फोन करणारी व्यक्ती ही खुनाच्या गुन्हामध्ये बेळगाव येथील तुरुंगात शिक्षा भोगत असून, जयेश कंठा असे या आरोपीचे नाव आहे. या व्यक्तीने तुरुंगातूनच गडकरींच्या कार्यालयात धमकीचा फोन केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
नागपूर येथे केंद्रीय मंत्री गडकरी यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. या कार्यालयात शनिवारी सकाळी तीनवेळा निनावी फोन आले. त्यामध्ये गडकरी यांच्याकडे 100 कोटींच्या खंडणीची मागणीही करण्यात आली. खंडणी न दिल्यास बॉम्बस्फोट करण्याची धमकीही दिली होती. बीएसएनएल क्रमांकावरून गडकरींच्या कार्यालयात शनिवारी सकाळी 11.25., 11.32 आणि दुपारी 12.32 वाजता, असे तीन कॉल आले. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने तत्काळ या कॉलचा तपशील तपासला. त्यातून आरोपीची माहिती पोलिसांना मिळाली.
याबाबत अधिक माहिती देताना नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, गडकरी यांना बेळगावच्या कारागृहातून धमकीचे फोन आले. फोन करणाऱ्या आरोपीला हत्येच्या गुन्ह्यासाठी शिक्षा झाली आहे. त्याची शिक्षा तो कारागृहात भोगत आहे. कारागृहातही त्याने फोनचा बेकायदेशीरपणे वापर केला. फोन करणाऱ्या आरोपीचे नाव कंठा असे आहे. त्याची ओळख पटली आहे. त्याच्याकडून कारागृह प्रशासनाने डायरीही जप्त केली आहे.
त्याला गडकरी यांच्या कार्यालयाचा फोन क्रमांक कोणी दिला? त्याने का फोन केला? कोणाच्या सांगण्यावरुन फोन केला? याची चौकशी करण्यासाठी नागपूर पोलिसांचे एक पथक बेळगावला पाचारण करण्यात आले आहे. नागपूर पोलीस आरोपीच्या कोठडीची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.





