Pune District | दर्जाहिन रस्त्याला टक्केवारीची किड शिरूर शहरातील रस्त्याची वाट

शिरूर : शिरूर शहरातील अंतर्गत रस्त्याची वाट लागली असून शिरूर नगरपरिषद याकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेबाबत अनेकदा आंदोलने, उपोषणे झालेली आहेत. त्यानंतर यावर तात्पुरत्या स्वरुपात रस्त्यांना मलमपट्टी देखील केलेली आहे. आजही त्याच पद्धतीची मलमपट्टी आहे. पाबळ फाटा ते विद्याधाम शाळा हा रस्ता चांगल्या दर्जाचा आहे. शहराला शोभा देणारा झाला आहे. परंतु, याउलट पाबळ फाटा ते रिलायन्स पेट्रोल पंप बायपासपर्यंतचा व विद्याधाम शाळा ते सतराकमानी पूल रस्त्यावर मात्र अन्याय झाला आहे.
नगरपरिषदेकडे जाणाऱ्या रस्त्यावरच मोठे खड्डे पडले आहे. ही लाजीरवाणी बाब आहे.
रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांबाबत अद्यापर्यंत कोणतेही ठोस पावले उचलली नाहीत, तात्पुरता स्वरूपात थोडी डागडुजी केली जाते. परत रस्ता खराब होतो. रस्त्यावर कायमस्वरूपी तोडगा निघणे गरजेचे आहे. रस्त्यावरील खड्डयांमुळे अपघात होऊन अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक जणांना कायमचे अपंगत्व देखील स्वीकारावे लागले आहे. खड्ड्यांमुळे नागरिक इतके त्रस्त झाले आहेत की, त्यांना त्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
ररस्त्यावरून ये – जा करणाऱ्या शिरूर शहरातील नागरिकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लहान मुलांना बागेत घेऊन येणे, वॉकींग करण्यासाठी बाहेर पडणे, इतर कार्यक्रमासाठी खड्डे पडलेल्या रस्त्याने प्रवास करणे कठीण झाले आहे. खराब, चाळण झालेल्या, गतिरोधक नसणाऱ्या, पाणीसाठा होणाऱ्या खड्ड्यांमुळे अजूनही मोठी जीवितहानी होण्याची तसेच नाहक बळी जाण्याची देखील शक्यता आहे.
मनसे रांगोळी स्पर्धा भरविणार
रस्त्याच्या दुरुस्तीबाबत ठोस पावले न उचलल्यास रस्त्यांवर “भव्य रांगोळी स्पर्धा ” आयोजित करण्यात येणार आहे. असे लेखी निवेदन शिरूर मनसेने नगर परिषदेला दिले आहे. यावेळी जनहित विधी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. स्वप्नील माळवे, विधिचे ॲड. कैलास गाडीलकर, ॲड. प्रतीक लोखंडे, माजी शहाराध्यक्ष संदीप कडेकर, महिला आघाडीच्या डॉ. वैशाली साखरे, शाम पवार, विकास बोरुडे, मिलिन परदेशी, परेश सूपते, समद काझी व कार्यकर्ते उपस्थित होते.





