जळगाव : राज्यात सुरू झालेल्या फोडाफोडीच्या राजकारणाने जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार येऊ दे, असे साकडे भाजपमध्ये प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी बाप्पाला घातले आहे. खडसेंच्या मुक्ताईनगरमधील घरी बाप्पाची विधीवत स्थापना झाली. त्यानंतर बोलताना खडसे यांनी ही भावना व्यक्त केली. एकनाथ खडसे म्हणाले, भाजपमध्ये माझा प्रवेश होईल अशी आशा असल्यामुळे सहा महिने मी स्तब्ध होतो. मात्र आता वारंवार माध्यमां समोर येऊन आपली भूमिका मांडणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच महाराष्ट्रात राजकीय स्थिती फारशी चांगली नाही. महागाईने जनता त्रस्त झालेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार यावे असे वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, खडसे यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जळगाव जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्यामुळे आपला भाजपामधील प्रवेश रखडल्याचा आरोप केला होता. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते आपला भाजपा प्रवेश झाला होतो. तो नड्डा यांनी जाहीर करायला हवा होता. पण फडणवीस आणि महाजन यांनी विरोध केल्यानं भाजपामध्ये प्रवेश झाला नाही. याचाच अर्थ देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन हे दोघं जेपी नड्डा यांच्यापेक्षा मोठे असल्याची खोचक टीका खडसे यांनी केली होती.