अनाथ मुलीला मिळाला माहेरचा आधार

शिक्रापूर पोलीस व नागरिकांमुळे मायेची ऊब
शिक्रापूर – शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौक परिसरात ऐन पावसामध्ये दोन दिवसांपासून भटकणाऱ्या अल्पवयीन युवतीला शिक्रापूर पोलीस व नागरिकांच्या सतर्कतेने माहेर संस्थेच्या माध्यमातून मायेचा आधार मिळाला आहे.
शिक्रापूर येथील पाबळ चौक परिसरात एक लहान मुलगी दोन दिवसांपासून पावसामध्ये भटकत असल्याचे उषा महाजन, तबस्सुम तांबोळी, संदीप महाजन यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबत शिक्रापूर पोलिसांना माहिती दिली असता सहायक पोलीस उपनिरीक्षक वेरणनाथ मुत्तनवार, जयराज देवकर, दिक्षा कांबळे यांनी सदर युवतीला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येत तिची विचारपूस केली.
तिचे नाव आशियाना अन्सारी असून तिच्या आईने उत्तरप्रदेश येथून तिला येथे आणून सोडून दिल्याचे समोर आले. दरम्यान, पोलिसांनी तिची विचारपूस करीत शाळेबाबत माहिती घेतली. काहीही माहिती मिळू शकली नाही.
शिक्रापूर पोलिसांनी तिला अनाथांसाठी कार्य करणाऱ्या माहेर संस्थेत दाखल केल्याने आशियानाला शिक्रापूर पोलीस व नागरिकांच्या सतर्कतेने माहेर संस्थेच्या माध्यमातून मायेची ऊब मिळाली आहे.





