घरी बसून स्वयंअध्ययनाचा पर्याय

सीईटीसह अन्य प्रवेश परीक्षांच्या अभ्यासासाठीचे इंटरनेटवर साहित्य उपलब्ध
पुणे -करोना विषाणू संसर्गामुळे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी अनिवार्य असणारी एमएचटी-सीईटीसह अन्य प्रवेश परीक्षांचे क्लास बंद केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरी बसून स्वयं अध्ययन करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी इंटरनेटवर अभ्यासाचे साहित्य उपलब्ध असून, त्यानुसार अभ्यास करणे योग्य राहणार आहे.
बारावीनंतर आयुष्याचा टर्नींग पॉईंट असणाऱ्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा तोंडावर आलेल्या असताना “करोना’मुळे राज्यातील सर्व खासगी क्लासेस बंद झाले आहेत. बारावी परीक्षा संपल्यानंतर परीक्षांच्या तयारीला वेग येतो. क्लासमध्ये जाण्याचे विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढते. मात्र, यंदा करोनामुळे विद्यार्थ्यांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. “जेईई मेन्स’ची परीक्षा 5 ते 11 एप्रिलदरम्यान होणार होती. मात्र, करोनामुळे या परीक्षेची नवी तारीख 31 मार्च रोजी जाहीर केली जाईल.
महाराष्ट्रात सीईटी सेलकडून एप्रिल महिन्यात नियोजित असलेल्या अभियांत्रीकीच्या प्रवेश परीक्षेसह इतर परीक्षेसंदर्भात 31 मार्चनंतर करोनाची स्थिती कशी असेल याचा आढावा घेऊन निर्णय होणार आहे. बारावी परीक्षा संपली की त्यानंतर बहुतांश क्लासमध्ये क्रॅश कोर्स सुरू होतो. त्यासाठी राज्यभरातून विद्यार्थी पुण्यात येतात. तसेच गेल्या दोन वर्षांपासून जेईई, सीईटी, नीट या प्रवेश परीक्षेचे महत्त्व वाढले आहे. पण क्लासेस बंद झाल्याने विद्यार्थ्यांपुढे अभ्यास करून चांगले गुण कसे घ्यायचे असा प्रश्न पडला आहे.
“क्लासेस बंद झाल्याने विद्यार्थ्यांनी निराश होण्याची गरज नाही. प्रवेश परीक्षांच्या सर्व विषयांचे साहित्य ऑनलाइन मोफत व सशुल्क उपलब्ध आहे. त्याचा वापर विद्यार्थ्यांनी करावा. तसेच या काळात विद्यार्थ्यांनी ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षांच्या प्रश्नपत्रिका सोडविण्यावर भर दिला तर त्यांना परीक्षेत चांगला फायदा होईल. क्लास बंद असले तरी शिक्षकांच्या संपर्कात राहून आपले प्रश्न त्यांना विचारावेत, असे प्रवेश परीक्षांचे मार्गदर्शकांकडून सांगण्यात आले आहे.





