Nagar | शहरात व्हायरल आजारांच्या रूग्णांची संख्या वाढली

नगर, (प्रतिनिधी) – ढगाळ वातावरण, अधूनमधून पडर्या पावसाच्या सरी, मधेच पडणारे कडक ऊन, समवेत सोसाट्याचा वारा… अशा विचित्र हवामानामुळे नगर शहरात व्हायरल आजारांच्या रूग्णांची संख्या वाढली आहे. ताप, सर्दी, खोकला, घसा आणि तीव्र स्वरूपाची अंग दु:खीची लक्षणे असणारे रुग्ण आढळत आहेत.
यामुळे खासगी रुग्णालयासंह शासकीय रुग्णालय हाऊसफुल्ल झाले आहेत. दरम्य़ान, जिल्ह्यात विषाणूजन्य रुग्णांची संख्या वाढत असून नागरिकांनी लक्षणे दिसताच आरोग्य सल्ला घेण्यासोबत उपचार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पावसामुळे वाढलेले गवत, ढगाळ हवामान आणि त्यामुळे उत्पत्ती होणार्या डासामुळे व्हायरल आणि तापासह विषाणूजन्य आजारामुळे बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.
ग्रामीण भागात देखील वेगळी परिस्थी नसून सर्दी आणि तापाचे रुग्ण संख्या जिल्ह्यातही वाढली असल्याचे सांगण्यात येते. याशिवाय नगर शहर आणि उपनगराच्या परिसरात डेंग्यू आणि चिकनगुणिया सदृष्य इन्फुल्यूंझा या विषाणूजन्य आजाराने पीडित रुग्णांची संख्या वाढत आहे. हे आजार प्रामुख्याने डासांमुळे आणि हवेतून पसरणार्या विषाणूमूळे वाढत आहेत.





