Narayangaon News : वनक्षेत्राबाहेरील बिबट्यांची संख्या १५ मे नंतर स्पष्ट होणार; जुन्नर वनविभागाकडून सर्व्हे सुरू
Narayangaon News : यासाठी १०० स्क्वेअर किलोमीटरचे सॅम्पल प्लॉट्स आणि ५० ग्रीड निश्चित करून ३५० अत्याधुनिक कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मंचर येथील पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाल्यानंतर आता ओतूर, जुन्नर आणि शिरूर रेंजमध्ये पहिल्या टप्प्याचे काम सुरू आहे.

नारायणगाव : जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि खेड तालुक्यातील मानव-बिबट संघर्ष रोखण्यासाठी जुन्नर वनविभागाने ठोस पाऊल उचलले आहे. वनक्षेत्राबाहेर राहणाऱ्या बिबट्यांची नेमकी संख्या मोजण्यासाठी २२ डिसेंबर २०२५ पासून वाइल्ड लाईफ कन्झर्वेशन सोसायटीच्या माध्यमातून व्यापक सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या गणनेचा अंतिम अहवाल १५ मे २०२६ पर्यंत प्राप्त होणार असून, त्यानंतरच संघर्षावर नियंत्रण मिळवण्यासाठी नेमक्या उपाययोजना निश्चित केल्या जातील, अशी माहिती उपवनसंरक्षक प्रशांत खाडे व सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस यांनी दिली.
पूर्वीच्या सर्वेक्षणात केवळ ठराविक क्षेत्राचा समावेश होता, मात्र यावेळी सात रेंजमधील खासगी वनक्षेत्राचाही अभ्यास केला जात आहे. यासाठी १०० स्क्वेअर किलोमीटरचे सॅम्पल प्लॉट्स आणि ५० ग्रीड निश्चित करून ३५० अत्याधुनिक कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मंचर येथील पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाल्यानंतर आता ओतूर, जुन्नर आणि शिरूर रेंजमध्ये पहिल्या टप्प्याचे काम सुरू आहे. या शास्त्रीय पद्धतीमुळे बिबट्यांच्या हालचाली आणि संख्येचे अचूक विश्लेषण करणे शक्य होणार आहे.
भविष्यातील धोरण ठरवणे सोपे जाणार
सर्वेक्षणाचा दुसरा टप्पा १५ मार्च २०२६ ते १५ एप्रिल २०२६ या काळात राबवण्यात येणार आहे. यामध्ये घोडेगाव, खेड आणि चाकण या रेंजचा समावेश असेल. १५ मे २०२६ पर्यंत पूर्ण अहवाल हाती आल्यावर वनविभागाला मानव-बिबट संघर्ष टाळण्यासाठी भविष्यातील धोरण ठरवणे सोपे जाणार आहे.
वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली गणना…
या प्रकल्पासाठी ७० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. प्रमुख जीवशास्त्रज्ञ निकित सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली आणि स्मिता राजहंस यांच्या नियंत्रणाखाली चार संशोधक, स्वयंसेवक आणि २८ सहाय्यक या कामात सहभागी आहेत. प्रत्येक वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली ही गणना प्रक्रिया पार पाडली जात आहे.
अधिवासाची नेमकी माहिती उपलब्ध होईल…
कॅमेऱ्यांतून बिबट्यांच्या प्रतिमा टिपल्या जात असून दर तीन दिवसांनी मेमरी कार्ड बदलून डेटा संकलित केला जात आहे. संकलित प्रतिमांचे तांत्रिक पद्धतीने पृथक्करण करून बिबट्यांची अधिकृत संख्या निश्चित केली जाईल. या प्रक्रियेमुळे बिबट्यांच्या अधिवासाची नेमकी माहिती वनविभागाला उपलब्ध होईल.





