कोपरगाव – तालुक्यातील सुरेगाव येथील मोतीनगर भागातील एकाच कुटुंबातील 8 व्यक्तींना करोनाची बाधा झाली तर बाधित व्यक्तींवर उपचार करणाऱ्या एका खासगी डॉक्टरही बाधित झाल्याने डॉक्टरांसह इतरांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची संख्या एकट्या सुरेगाव परिसरात 75 झाली आहे तर करंजी येथील बाधित रुग्ण व त्याच्या संपर्कातील व्यक्ती मिळून आकडा शतकीपार झाल्याने स्थानिक प्रशासनाची झोप उडाली आहे.
इतक्या मोठ्या संख्येने संपर्कातील लोकांची करोना चाचणी करण्यासाठी वैद्यकीय विभागाने सुरेगाव येथे स्वतंत्र नविन रॅपिड ऍन्टीजन कीट अर्थात स्वतंत्र तपासणी यंत्रणा सज्ज केली असून बाधित निघालेल्या व्यक्तीवर त्वरीत उपचार करता येणार आहेत.
अतिदक्षतेसाठी एखाद्या बाधित निघालेल्या रुग्णांस अहमदनगर जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येईल, अशी माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. सध्या कोपरगाव कोव्हीड केअर सेंटर येथे करोनाबाधीत 9 रुग्णांवर उपचार चालू असुन सर्वांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडोदे यांनी दिली आहे.
तालुक्यातील करोना बाधितांची साखळी तोडण्याचा प्रयत्न करीत असुन नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाटे व तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.