Satara News : सह्याद्रीच्या निवडणुकीत निवासराव थोरात यांच्यासह 9 जणांचे उमेदवारी अर्ज वैध

यशवंतनगर : वाढत्या उन्हासोबत सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकपूर्व प्रचाराचा ज्वर देखील वाढताना दिसत आहे. सह्याद्रीच्या निवडणुकीच्या मैदानात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य निवासराव थोरात यांचा पुनःप्रवेश झालेला आहे. अर्ज छाननीच्या दिवशी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवासराव थोरात यांच्यासह त्यांचे समर्थक असलेल्या अन्य ८ जणांचा उमेदवारी अर्ज आक्षेपानंतर अवैध ठरवले होते.
या निर्णयाच्या विरोधात निवासराव थोरात यांनी समर्थक उमेदवारांसह प्रादेशिक सहसंचालक (साखर), पुणे विभाग, पुणे, साखर संकुल, शिवाजीनगर यांचेकडे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्याच्या निर्णयाविरुद्ध कलम १५२(अ) अन्वये अपील दाखल केले. त्यावर गुरुवार दि. १३ मार्च २०२५ रोजी सुनावणी झाली होती. मात्र, या अपात्र ठरवण्यात आलेल्या उमेदवारांच्या अपिलावरील निकाल १८ मार्चपर्यंत राखून ठेवला होता. या निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. अखेर निवासराव थोरात यांच्यासह नऊ उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत.
प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी हा निकाल जाहीर करताना निवासराव थोरात यांच्यासह दिलीप कुंभार, सिंधुताई जाधव, बाबुराव पवार, जयश्री पाटील, प्रतापराव यादव, अधिकराव माळी, श्रीकांत जाधव, संदीप पाटील यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरवले आहेत. त्यामुळे या निवडणुकीला रंगपंचमीपासून वेगळाच रंग चढणार असल्याची चर्चा सभासदांमध्ये सुरु झालेली आहे. दि. २१ मार्च रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. यानंतर अंतिम पॅनेलची दिशा स्पष्ट होणार आहे.
‘निवडणूक लढणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मी समाजकारण करत नाही. माझा उद्देश सह्याद्रीच्या सर्व सभासदांना समान न्याय मिळावा इतकाच होता. सभासदांच्या आग्रहामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरलो. परंतु, काहींनी मला थांबवण्यासाठी माझ्याविरोधात कटकारस्थाने रचली. माझी लढाई यशवंत विचारांची आहे. सत्याचा विजय झालेला आहे. सभासदांनी कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये. माझे मार्गदर्शक व सहकारी यांच्यासमवेत निवडणूकीच्या प्रचाराची आगामी दिशा मी पत्रकार परिषद घेवून स्पष्ट करणार आहे.’
– निवासराव थोरात





