नवलखांना मुंबईला न्यायला एनआयएची घाई

नवी दिल्ली – भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी आणि सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांना मुंबईमध्ये हलवण्यात राष्ट्रीय तपास संस्था अर्थात “एनआयए’ने घाई केली, असे निरीक्षण दिल्ली उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून केलेल्या सुनावणीच्यावेळी न्या. अनुप जे. भांभानी यांनी “एनआयए’ने खूप घाई केल्याचे पुरावे उपलब्ध असल्याचे, निरीक्षण नोंदवले.
आठवड्याच्या अखेरच्या दिवशी, ईदच्या सणाच्या दिवशी आणि ई-मेलवरून आदेश मिळवून नवलखा यांना मुंबईला हलवण्यात आले. नवलखा यांना हलवण्याचे आदेश बुधवारी देण्यात आले आणि न्यायालयाच्या वेबसाईटवर गुरुवारी उपलब्ध झाले होते.
नवलखा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार 14 एप्रिल रोजी “एनआयए’समोर शरणागती पत्करली होती. त्यांना तिहार तुरुंगात ठेवण्यात आले होते. दिनांक 26 मे रोजी रेल्वेने त्यांना मुंबईला हलवण्यात आले होते. त्यांना तातडीने मुंबईला हलवण्याची घाई करावी, असे कोणतेही कारण आढळत नाही.
तपासाचा अहवाल देण्यास “एनआयए’ला पुरेसा अवधी दिला गेला होता. सुरू असलेल्या सुनावणी करणाऱ्या मुंबई किंवा दिल्लीतील विशेष न्यायाधीशांनाही न कळवता आणि मुंबईतील “एनआयए’ कोर्टाने समन्स न बजावताही नवलखा यांना मुंबईला नेले गेले. यातून “एनआयए’ने विनाकारणच घाई केल्याचे दिसत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.





