Weather Update – हवामान विभागाच्या अंदाजानुसार नववर्षाची सुरुवात गुलाबी थंडीने होणार आहे. येत्या चार ते पाच दिवसांत किमान तापमानात घट होणार असल्याने थंडी वाढणार आहे. हिमाचल प्रदेश, राजस्थान, पंजाब हरियाणा भागात थंडीची लाट राहणार असून राज्यात कोरडे हवामान राहणार आहे. राज्यातील कोकणासह उत्तर महाराष्ट्रात काही दिवस आकाश निरभ्र असेल. विदर्भात वाऱ्याचा वेग सामान्य राहणार आहे. असे असले तरीही इथे ढगांचे काहीसे सावट पाहायला मिळेल. नांदेड, बीड, परभणी, सातारा, सांगली, कोल्हापूर, आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये हवेत गारवा अनुभवता येणार आहे. मध्य महाराष्ट्रावर मात्र पुढील 48 तासांमध्ये चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव दिसणार असून, त्यामुळे थेट कोकण किनारपट्टीवर याचे परिणाम होताना दिसतील. तिथे, पावसाळी ढगांची दाटी असेल. राज्यात गेल्या आठवडाभरापासून संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात राज्यावर अवकाळी पावसाचे सावट होते. या काळात मुसळधार पावसासह काही भागात गारपीट देखील झाली. आता हवामानात बदल होणार असून राज्यातील अवकाळी पावसाचे संकट दुर होणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानूसार 2 जानेवारीपर्यंत ऊबदार वातावरण हळूहळू कमी होत जाणार आहे. त्यानंतर 7 जानेवारीपर्यंत पुन्हा संपुर्ण महाराष्ट्रात थंडीची लाट येईल. हवामान विभागाच्या अंदाजानूसार मुंबईत आज किमान तापमान 24.78 अंश सेल्सियस असेल, तर कमाल तापमान 28.13 अंश सेल्सियपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मुंबईत आज शक्यतो ढगाळ वातावरण नसेल आणि आकाश स्वच्छ असेल. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रात दिवसाची सुरुवात 15.2 अंश सेल्सिअसच्या किमान तापमानाने होईल. कमान तापमान 18.3 सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. दुपारी किंवा संध्याकाळी ढगाळ वातावरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, परंतू पुढील चार पाच दिवस आकाश स्वच्छ असेल. तर मराठवाड्यात किमान तापमान 22 अंश सेल्सिअस असेल, तर कमाल तापमान 25.4 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे.