ज्येष्ठांच्या भावना समजून घेण्याची गरज

नगर -जो हसतमुख असतो, तो नेहमी सुखी असतो. ज्याचे मन आनंदी असते, तोच खऱ्या अर्थाने धनवान. आनंदी चेहरा हा जीवनाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळेच माणसाने नेहमी आनंदी व समाधानी रहावे. माणूस वयाने जरी वृद्ध झाला असेल, परंतु तो मनाने तरुणच असतो. समाजानेही वृद्धांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत, अशी भूमिका ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष के. डी. खानदेशे यांनी व्यक्त केली.
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन संघाच्या वतीने विळद घाट येथील मातोश्री वृद्धाश्रमात साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ नागरिक संघाचे शिवाजीराव ससे, नूरआलम शेख, मधुकर वालेकर, श्रीकृष्ण लांडगे, रामदास लालबागे, डॉ. अरविंद गुगळे, दत्तात्रय फुलसौंदर, सर्वोत्तम क्षीरसागर, मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक दिलीप चोरडिया, महावीर जैन आदींसह ज्येष्ठ नागरिक व महिला यावेळी उपस्थित होत्या.
वृद्धाश्रमातील वृद्धांसाठी किराणा साहित्य देऊन त्यांना स्नेहभोजन देण्यात आले. वृद्धाश्रमचे व्यवस्थापक दिलीप सुर्वे यंनी स्टेशन परिसर आगरकर मळा ज्येष्ठ नागरिक संघाचे आभार मानले. अशा सर्व सामाजिक संघटनांनी अशा प्रकारचे उपक्रम राबवावेत. ज्येष्ठांनी ज्येष्ठांसमवेत ज्येष्ठ नागरिक दिन साजरा केला ही एक कौतुकास्पद बाब आहे, असे ते म्हणाले.





