तुम्हाला माहित आहे का, अनेक भारतीय शहरांची नावे ही अनेक आंतरराष्ट्रीय ठिकाणांची नावे देखील आहेत. पुढील दहा शहरांच्या नावांचा विचार केला तर तशाच नावाची आणखी शहरे पृथ्वीच्या पाठीवर अन्य देशांमध्ये असल्याचे दिसून येते.
१) कोची हे शहर भारतातील केरळ राज्यात आहे. मात्र कोची नावाचे आणखी एक शहर जपानमध्ये आहे. जपान मधील कोची शहर हे देखील लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. विशेष म्हणजे दोन्ही कोची शहरे ही समुद्रकिनाऱ्यावर वसलेली आहेत आणि दोन्ही शहरातील नागरिकांना मासे खायला आणि सर्फिंग करायला आवडते.
२) पाटणा – पाटणा ही बिहारची राजधानी आहे आणि याच नावाचे शहर स्कॉटलंडमध्ये देखील आहे. स्कॉटलंड मधील शहर हे विल्यम फुलर्टन यांनी वसवलेले आहे. त्यांचे वडील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीत नोकरी करत होते.
३) दिल्ली – दिल्ली ही भारताची राजधानी आहे आणि या शहराची वेगळी ओळख करून देण्याची भारतीयांना गरज नाही. मात्र न्यूयॉर्कच्या जवळच दिल्ली नावाचे छोटेसे शहर आहे. तसेच अमेरिकेतील इलिनॉईस राज्यातही या नावाचे आणखी एक छोटेसे गाव आहे.
४) कलकत्ता – या शहराला आता कोलकाता म्हणून ओळखले जाते. या शहराला इतिहास, संस्कृती, भाषा यांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. भारतातील कोलकत्याबरोबरच अमेरिकेतही कलकत्ता नावाचे शहर आहे. १८७० मध्ये कोळशाखाणीतील कामगारांसाठी हे गाव बसवण्यात आले.
५) लखनऊ – ही उत्तर प्रदेशची राजधानी आहे आणि या ठिकाणी अनेक जुन्या बांधकाम शैलीतील सुंदर इमारती पाहायला मिळतात. अमेरिकेतही लखनऊ नावाचे एक ठिकाण आहे. हा 16 दालने असलेला एक किल्ला आहे.
६) हैदराबाद ही तेलंगणाची राजधानी असून पाकिस्तानातील सिंध प्रांतातही हैदराबाद नावाचे शहर आहे. ते पाकिस्तानातील सातव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. त्या शहराची निर्मिती कल्होरा राजघराण्यातील मिया गुलाम शाह कल्होरा यांनी केलेली आहे.
७) सालेम – तमिळनाडूतील वस्त्र नगरी म्हणून ओळखले जाणारे शहर चांदीचे दागिने आणि आंब्यांसाठी देखील या शहराची ओळखले जाते. याच नावाचे शहर अमेरिकेतील मॅसॅच्युसेटस् राज्यामध्ये आहे.
८) ठाणे हे महाराष्ट्रातील एक मोठे शहर आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियातील क्वींसलँड मध्ये देखील ठाणे नावाचे गाव आहे. जॉन ठाणे या व्यक्तीच्या स्मरणार्थ त्या गावाची निर्मिती करण्यात आलेली आहे.
९) बाली म्हटले की आपल्याला इंडोनेशियाची आठवण येते मात्र याच नावाचे छोटेसे शहर राजस्थान मधील पाली जिल्ह्यातही आहे.
१०) बरोडा/बडोदा ; अमेरिकेत या नावाने पोस्ट ऑफिस आहे. सी. एच. पिंडर यांच्या स्मरणार्थ हे नाव ठेवण्यात आले आहे. पिंडर यांचा जन्म गुजरातमधील बडोदा येथे झाला होता.