Maharashtra Assembly : विधानसभेत ‘संजय’ नावाची हवा अन् ‘पाटील’ आडनावाचा दबदबा; जाणून घ्या राजकीय गमतीचा टच…

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात अनिश्चितता कायम असली, तरी विधानसभेत ‘संजय’ नाव आणि ‘पाटील’ आडनावाचा जलवा कायम आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सभागृहात 10 हून अधिक ‘संजय’ नावाचे आमदार आणि तब्बल 24 ‘पाटील’ आडनावाचे आमदार विराजमान आहेत. जर स्पीकरने “संजय, उठ!” म्हटले, तर किमान 10 जण उभे राहतील, आणि “पाटील, बाहेर जा!” असे सांगितले, तर अर्धे सभागृह रिकामे होईल, अशी खुमासदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
‘पाटील’ आडनावाचा दबदबा
पाटील आडनावाचे आमदार नंदुरबार ते नागपूर आणि चंद्रपूर ते सिंधुदुर्ग अशा जवळपास प्रत्येक जिल्ह्यातून विधानसभेत पोहोचले आहेत. ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यापासून ते तरुण तुर्क रोहित पाटील यांच्यापर्यंत, 24 पाटील आमदारांनी विधानसभेत आपली ताकद दाखवली आहे. यामध्ये गुलाबराव पाटील, अनिल पाटील, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब पाटील, राणा जगजीतसिंह पाटील, अभिजीत पाटील, सचिन पाटील, मकरंद जाधव पाटील, रोहित पाटील यांच्यासह इतरांचा समावेश आहे. इतक्या संख्येने पाटील आमदार असणे, हा मिझोरामसारख्या छोट्या राज्याच्या विधानसभेपेक्षा (32 आमदार) आणि गोव्याच्या 40 आमदारांपेक्षा मोठा आकडा आहे.
‘संजय’ नावाची हवा
‘संजय’ नावाचे आमदारही मागे नाहीत. विधानसभेत 10 संजय नावाचे आमदार असून, प्रत्येक पक्षात एक संजय सापडतोच. यामध्ये संजय उपाध्याय (भाजप, बोरीवली), संजय पोटनीस (शिवसेना UBT, कालिना), संजय राठोड (शिवसेना, दिग्रस), संजय गायकवाड (शिवसेना, बुलढाणा), संजय कुटे (भाजप, जळगाव-जामोद), संजय शिरसाट (शिवसेना, औरंगाबाद पश्चिम), संजय सावकारे (भाजप, भुसावळ), संजय मेस्राम (काँग्रेस, उमरेड), संजय पुरम (भाजप, आमगाव), आणि संजय बनसोडे (राष्ट्रवादी, उदगीर) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, संजय राऊत यांच्यासारखे नेते विधानसभेत नसले तरी त्यांच्या वक्तव्याने राजकारण तापत असते. संजय गायकवाड तलवारीसह चर्चेत येतात, तर संजय शिरसाट शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून ठाकरे गटाला प्रत्युत्तर देतात.
राजकीय गमतीचा टच
‘संजय’ आणि ‘पाटील’ यांच्या या संख्याबळामुळे विधानसभेत एक वेगळाच गमतीदार माहोल आहे. 24 पाटील आणि 10 संजय यांच्या उपस्थितीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचा दबदबा स्पष्ट दिसतो. “पाटील गटाने कार्यमंडळ बनवावे आणि संजय मंडळींनी त्यांचा जलवा कायम ठेवावा,” अशी खुमासदार चर्चा राजकीय गल्लीबोळात सुरू आहे.





