Shirur : नादविहंग लेझीम पथकाने लक्ष वेधले
Shirur : आपला व्यवसाय, नोकरी, शिक्षण आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून १४ महिलांनी वेळात वेळ काढत नादविहंग हा ग्रुप तयार करून लेझीमचा उत्कृष्ट सराव केला व पथक उभे केले. ‘

शिरूर : काळाच्या ओघात आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपली पारंपारिक संस्कृती तसेच ढोल-लेझीमचा रांगडा खेळ लोप पावत चालला आहे. आजच्या नव्या पिढीला या पारंपरिक लोककलेची पुरेशी माहितीही उरलेली नाही. मात्र, हीच लोप पावत चाललेली संस्कृती पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि नव्या पिढीसमोर तिचे महत्त्व पटवून देण्यासाठी शिरूरच्या नादविहंग या ग्रुपच्या महिला रणरागिनींनी पुढाकार घेतला आहे.
आपला व्यवसाय, नोकरी, शिक्षण आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून १४ महिलांनी वेळात वेळ काढत नादविहंग हा ग्रुप तयार करून लेझीमचा उत्कृष्ट सराव केला व पथक उभे केले. ‘नादविहंग लेझीम पथका’च्या या रणरागिणींनी कुंभार आळी येथील ‘श्रीमंत हलवाई चौक गणेश मित्र मंडळ’ येथे लेझीमचे अप्रतिम सादरीकरण केले.
ताल आणि लेझीमच्या लयबद्ध आवाजाने उपस्थितांची मने जिंकून घेणाऱ्या या दुर्गांचे प्रात्यक्षिक पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा गजर केला. सोहळ्याला मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते. संस्कृती आणि परंपरेचे जतन करणाऱ्या या महिलांचे व मार्गदर्शन करणाऱ्या गीताताईंचे उपस्थितांकडून मनापासून कौतुक करण्यात येत आहेत.
नादविहंग लेझीम पथकाचे रणरागिणी भारती बारवकर, दीप्ती कवितके, वर्षा नारखडे, गीता आढाव, सुजाता दाते, आश्विनी शिंदे, प्रियांका चोप्रे, मोहिनी चव्हाण, रुचिता नारखेडे, प्रतीक्षा मोरतळे, प्रतिज्ञा मोरतळे, रचना केदारी, दीपाली गुंजाळ, गौरी गुंजाळ आदी महिला उपस्थित होत्या.





