पुणे : तब्बल तीन वर्षांनंतर महापालिका निवडणूका होत असून या निवडणूकांसाठी शहरात सर्वच प्रभागात मोठ्या प्रमाणात इच्छुकांची संख्या अधिक आहे. मात्र, त्या तुलनेत महापालिकेकडून उमेदवारांचे अर्ज, छाननी, अर्ज माघारी घेणे, अंतीम उमेदवार यादी तसेच चिन्ह वाटपासाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय यंत्रणेची उभारणी न केल्याने अद्यापही महापालिकेकडे कोणतीही ठोस माहिती नसल्याचे समोर आले आहे. अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर अंतीम उमेदवारी जाहीर करण्याची मुदत संपली असली तरी, किती अर्ज आले? किती उमेदवारांनी माघार घेतली? एकूण किती उमेदवारांना चिन्ह वाटप झाले, अशी कोणतीही माहिती महापालिकेच्या निवडणूक विभागाला शनिवारी सायंकाळी उशीरा पर्यंत प्रसार माध्यमांना देता आली नाही. धक्कादायक बाब म्हणजे महापालिकेचे निवडणूक विभागाचे उपायुक्त प्रसाद काटकर, अतिरिक्त आयुक्त ओम प्रकार दिवटे, महापालिका निवडणूक प्रमुख आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह, माध्यम कक्षाची जबाबदारी असलेले उपायुक्त तुषार बाबर यांच्याकडेही ही माहिती नसल्याने त्यांच्याकडून क्षेत्रीय कार्यालयांच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे बोट दाखविले जात आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर २४ तास उलटूनही अचूक व अंतिम याद्या निवडणुक विभागाने जाहीर केल्या नाहीत. आता चिन्ह वाटप झाले तरीदेखील अंतिम याद्या जाहीर केल्या जात नाहीत. महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरही आवश्यक माहिती वेळेवर उपलब्ध करून दिली जात नसल्याने मतदार तसेच उमेदवारांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली असून माध्यमांसह, नागरीक तसेच राजकीय पक्षांकडूनही या ढिसाळ नियोजनाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. मतदारांमध्येही गोंधळ आत्तापर्यंतच्या उमेदवारी अर्ज भरणे, छाननी आणि माघारीची प्रक्रियांमध्ये कोणतीच माहिती वेळेवर आणि पुर्णपणे जाहीर न केल्याने कोण-कोणा विरूध्द कोण कोणत्या पक्षातून हे समोर येत नाही. त्यामुळे मतदारांमध्येही संभ्रम असून प्रचाराला उमेदवार आल्यानंतर उमेदवारांची माहिती मिळत आहे. तर ही माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावरही अपडेट केली जात नाही. त्यामुळे प्रशासन नेमके कोणासाठी ही दिरंगाई करत आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.