पुणे : शहरातील रस्त्यावरील 90 टक्के खड्डे तीन दिवसात बुजविल्याचा दावा करणाऱ्या महापालिका प्रशासनाने आपलाच दावा खोटा असल्याचा पुरवा दिला आहे. सोमवारी पालिकेने शहरात 968 खड्डे 16 ते 18 जुलै या कालावधीत दुरूस्त केले असून 90 टक्के खड्डे दुरूस्ती झाल्याचा दावा केला होता. त्यामुळे पालिकेच्या दाव्यानुसार, शहरात अवघे 10 टक्के ( म्हणजेच 96 ते 100 ) खड्डे दुरूस्त करणे शिल्लक राहिले असताना पालिकेकडून मंगळवारी शहरात आणखी 238 खड्डे दुरूस्त केले असून 71 खड्डे दुरूस्त करणे बाकी असल्याची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यामुळे महापालिका खड्डयांबाबत केवळ कागदीघोडे नाचवित असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.
शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रस्त्यांची चाळण झाली आहे. या रस्त्यांमुळे पुणेकरांना मानदुखी कंबरदुखीचा त्रास सहन करावा लागत असतानाच; महापालिकेकडून मात्र, शहरातील रस्ते सुस्थितीत असून महापालिकेकडून खड्डे दुरूस्तीचे केवळ आकडे पुणेकरांसमोर मांडले जात आहेत.
मात्र, प्रत्यक्षात दुसऱ्या बाजूला रस्त्यांवरील खड्डयांमुळे पुणेकरांचा त्रास मात्र कमी होण्यास तयार नाही. त्यातच, पालिकेकडून पुणेकरांना दिखाव्यासाठी गेल्या तीन दिवसात 968 खड्डे दुरूस्त केल्याचा दावा करत पुणेकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचेच काम करण्यात आले आहे. मात्र, महापालिकेचा हा दावा महापालिकेनेच शहरातील रस्त्यांबाबत मंगळवारी दिलेल्या माहितीमधून खोटा ठरला आहे.
हॉटमिक्स प्लांटच सुरू होईना
दरम्यान, शहरात पावसाने उघडीप घेतली असली तरी पालिकेकडून रस्ते दुरूस्तीसाठी आवश्यक असलेली डांबर आणि खडी मिक्स करण्यासाठीचा हॉटमिक्स प्लांट अद्यापही सुरू केलेला नाही. पावसाळयात या प्रकल्पाच्या मशिनरी मध्ये बाष्प तयार होऊन ती बंद पडेल त्यामुळे पालिकेचा हॉटमिक्स प्लांट बंद असून पालिकेकडून कोल्डमिक्स, इम्लशन, पेव्हींग ब्लॉक्सचा वापर करून करण्यात येत असलेली खड्डे दुरूस्ती तकलादू ठरत असून महापालिका आता हॉटमिक्स प्लांट सुरू करण्यासाठी चक्क उन पडण्याची वाट बघत आहे.