Vishnu Gupta firing । हिंदू सेना या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांच्यावर आज सकाळी गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. राजस्थानच्या अजमेर शहरात ही घटना घडल्याचे म्हटले जात आहे. या हल्ल्यात गुप्ता थोडक्यात बचावले आहेत. गुप्ता अजमेरवरून दिल्लीला जात असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अजमेरमधील गेगल पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. गुप्ता यांनी, “त्यांच्या कारवर हा हल्ला झाला” अशी माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक वंदिता राणा व इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. गुप्ता यांच्या कारवर बंदुकीच्या गोळ्यांचे निशाण दिसत आहेत. पोलीस आता हल्लेखोरांचा तपास करत आहेत. अजमेर दर्ग्याखाली शिव मंदिर असल्याचा दावा Vishnu Gupta firing । दरम्यान, विष्णू गुप्ता यांनी अलीकडेच अजमेर दर्गा हा शिव मंदिर पाडून बांधलेला आहे असा मोठा दावा केला होता. या दर्ग्याच्या खाली मंदिराचे अवशेष आहेत. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. याप्रकरणी त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. अजमेर जिल्हा सत्र न्यायालयात शुक्रवारी याप्रकरणी सुनावणी झाली. तसेच त्यांनी त्यांच्या सुरक्षेसंबंधीची याचिका देखील दाखल केली आहे. गुप्ता यांना वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. त्यांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याने त्यांनी न्यायालयाचं दार ठोठावलं आहे. अशातच आज त्यांच्यावर गोळीबर झाला आहे. विष्णू गुप्तांची पहिली प्रतिक्रिया Vishnu Gupta firing । विष्णू गुप्ता यांनी हल्ल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली. त्यांनी याविषयी, “न्यायालयात सुनावणी चालू असताना आसपासच्या परिसरात मोठी गर्दी जमते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखणं अवघड होतं. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना अधिक बंदोबस्त करावा लागेल. मी पोलिसांना विनंती केली आहे की न्यायालयाच्या बाहेर शांतता राखावी. न्यायालय परिसरात शांततापूर्ण वातावरण राहावं, कायदा व सुव्यवस्था राहावी यासाठी पोलीस प्रशासन विशेष बंदोबस्त करेल अशी अपेक्षा आहे. हे धार्मिक भावनांशी संबंधित प्रकरण असल्याने स्थिती संवेदनशील बनली आहे. आमच्या याचिकेवरील सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, अजमेरच्या न्यायालयाने केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI), आणि अजमेर दर्गा समितीला नोटिसा बजावून प्रसिद्ध दर्गा शरीफचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्याच्या मागणीसंदर्भात उत्तर मागितले आहे. विष्णू गुप्ता यांनी दावा केला आहे की, १३ व्या शतकातील सूफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा मकबरा मूलतः एक शिवमंदिर होते. त्याच पार्श्वभूमीवर गुप्ता काही पुरावे व पुस्तकं सादर केली आहेत.