Dhanajirao Vinode: ऑनलाइन पेमेंटचा वेग कायम राहणार – धनाजीराव विनोदे
Dhanajirao Vinode : जयहिंद अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या प्रवासाचा मांडला लेखा-जोखा

पिंपरी : डिजिटल व्यवहारामुळे ग्राहकांचा वेळ वाचत असून, भविष्यातही ऑनलाइन पेमेंटचा वापर वाढत राहणार आहे. ऑनलाइन व्यवहारासाठी काही शुल्क आकारले गेले तरी ग्राहकांसाठी डिजिटल व्यवहार अधिक सोयीस्कर असल्याचे मत जयहिंद अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे संस्थापक व चेअरमन धनाजीराव विनोदे यांनी व्यक्त केले.
दैनिक प्रभातच्या पिंपरी-चिंचवड कार्यालयात आयोजित गणेशोत्सव विशेष मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी बँकेचा प्रवास, कर्जवाटप, कर्जवसुली आणि डिजिटल बँकिंग याबाबत माहिती दिली.
विनोदे म्हणाले की, १९९९ मध्ये जयहिंद बँकेची स्थापना करताना कामगार, शेतकरी, नोकरदार तसेच छोट्या-मोठ्या उद्योजकांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना छोटे कर्ज देऊन त्यांचे व्यवसाय उभे करण्यावर बँकेने भर दिला आहे. व्यवसायांना आर्थिक पाठबळ मिळाल्यास रोजगारनिर्मितीलाही चालना मिळते.
कोविड किंवा आर्थिक मंदीमुळे काही व्यवसाय अडचणीत येतात आणि कर्ज थकीत होते. अशा वेळी संबंधित व्यवसायाची परिस्थिती समजून घेऊन त्याला पुन्हा उभे करण्यासाठी बँकेने आर्थिक पाठबळ देणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. एनइएफटी, आरटीजीएस आणि यूपीआय मुळे ग्राहकांना बँकेत न जाता कुठूनही व्यवहार करता येतात. त्यामुळे वेळ वाचतो आणि व्यवहार अधिक सुलभ होतो.
भविष्यात बँकेच्या शाखा वाढवून अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट असल्याचेही विनोदे यांनी सांगितले. तसेच कर्जवसुलीची प्रक्रिया अधिक जलद व्हावी आणि सहकारी बँकांमधील ठेवींवरील विमा संरक्षण वाढवावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
Home Department: पोलिसांच्या २,६३३ अस्थायी पदांना सहा महिन्यांची मुदतवाढ; गृह विभागाचा निर्णय





