Home Department: पोलिसांच्या २,६३३ अस्थायी पदांना सहा महिन्यांची मुदतवाढ; गृह विभागाचा निर्णय
Home Department: २८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत पदे कायम

पिंपरी – शहरातील वाढती लोकसंख्या, औद्योगिक विस्तार आणि वाढते गुन्हे लक्षात घेता पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला मोठा दिलासा मिळाला आहे. आयुक्तालयातील २ हजार ६३३ अस्थायी पदांना शासनाने सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. गृह विभागाने १५ सप्टेंबर रोजी याबाबत शासन निर्णय जारी केला. ही मुदतवाढ १ सप्टेंबर २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीसाठी आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना १५ ऑगस्ट २०१८ मध्ये झाली. आयुक्तालयासाठी तीन टप्प्यांत विविध पदे मंजूर करण्यात आली होती. या पदांची मुदत ३१ ऑगस्ट रोजी संपली होती. पोलीस महासंचालक कार्यालयाच्या प्रस्तावानंतर शासनाने मुदतवाढ मंजूर केली.
पहिल्या टप्प्यातील १ हजार ५६८, दुसऱ्या टप्प्यातील ५५२ आणि तिसऱ्या टप्प्यातील ५१३ पदांचा यात समावेश आहे. पोलीस अधिकारी, अंमलदार, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, तांत्रिक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांची पदे यामध्ये आहेत.
मुदतवाढीमुळे कायदा व सुव्यवस्था, गुन्हे तपास, गस्त, वाहतूक नियमन तसेच प्रशासकीय कामकाजासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध राहणार आहे. पोलीस दवाखाना, न्यायालयीन कामकाज, फॉरेन्सिक आणि इतर मदत सेवांनाही यामुळे सातत्य मिळणार आहे. दरम्यान, सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ रिक्त असलेली पदे या मुदतवाढीतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे कार्यरत असलेल्या पात्र पदांनाच या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.





