‘मोदी सरकारच चायनीज मॉडेलवर चालतेय’ – आदित्य ठाकरे

मुंबई – केंद्रात असलेले मोदी सरकार हे चायनीज मॉडेलवर चालत असून ते चीनला डोळे दाखवायला घाबरते, अशी टीका ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तसेच उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचे होते, या अमित शाहांच्या आरोपालाही त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
आदित्य ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर सडकून टीका केली. आजची भाजपा ही जुनी भाजप नाही. आजची भाजप ही चायनीज मॉडेलवर चालत आहे. ज्या चीनला डोळे दाखवायला केंद्रातील मोदी सरकार घाबरते. मात्र, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न या सरकारडून सुरू आहे, असे ते म्हणाले.
भाजपला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान मान्य नाही. त्यांना लोकशाही मान्य नाही. आज देशातील महिला घाबरलेल्या आहेत. कर्नाटकातलं उदाहरण ताजे आहे. कर्नाटकमधील रेवन्ना प्रकरण भयंकर आहे. भाजपने मुंबईतही अशाच एका उमेदवाराला तिकीट दिले आहे, अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली.
निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका
निवडणूक आयोग आज पूर्ण भाजपच्या इशाऱ्यावर काम करत आहे. आमचा पक्ष दोन गटात विभागला गेला, तेव्हा त्याचा रिपोर्ट त्यांनी भाजपच्या सांगण्यावरून लिहिला होता.
आज निवडणूक आयोगाने आम्हाला जय भवानी जय शिवाजी हा नारा लावू नये, असा आदेश दिला आहे. जय भवानी जय शिवाजी हा नारा महाराष्ट्रात नाही द्यायचा तर कुठे म्हणायचं? एकंदरितच या लोकांचा महाराष्ट्र द्वेष पुढे आला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.





